Sleeping Problems: रात्री शांत झोप लागत नाही का? मध्यरात्री कधीही अचानक झोप मोडते का? तर तुम्ही झोप न येण्याच्या समस्येचा सामना करताय. काहीजण वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करतात, तरीही मध्यरात्री झोप मोडते आणि पुन्हा झोप लागत नाही. यामुळे सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटत नाही. ऑफिसला गेल्यानंतरही थकवा जाणवतो, कोणत्याही कामात लक्ष केंद्रीत होत नाही. जर तुम्हीही झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल आणि झोपेच्या गोळ्या घेण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा आणि हा निर्णय घेण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की ऐका. न्युट्रिशनिस्ट डॉ. अखिला जोशी यांनी झोपेसाठी रामबाण उपाय सांगितलाय, त्यांनी सांगितलेली एक गोष्ट खाल्ल्यास तुम्हाला शांत आणि गाढ झोप येईल.
झोप येत नसल्यास खा हा सुकामेवा
न्युट्रिशनिस्ट डॉ. अखिला जोशी यांनी झोपेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास काजू खाण्याचा सल्ला दिलाय. काजूमध्ये ट्रिप्टोफॅन नावाच्या तत्त्वाचा मोठा साठा असतो, ज्यामुळे शरीरात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचा स्त्राव होण्यास मदत मिळते आणि गाढ झोप येण्यास मदत मिळते. काजूमध्ये मॅग्नेशिअम आणि झिंक घटक देखील आहे, ज्यामुळे मज्जासंस्था शांत होण्यास आणि चिंता दूर होण्यास मदत मिळते.
कधी आणि कसे खावे काजू?
सकाळी तीन ते चार काजू भिजत ठेवा. भिजवलेले काजू झोपण्याच्या तासाभरापूर्वी खा. कमीत कमी 15 दिवसांसाठी भिजवलेल्या काजूचे सेवन करा. न्युट्रिशनिस्टच्या मते, हा उपाय केल्यास आरोग्यामध्ये हळूहळू सकारात्मक परिणाम दिसतील. काजूतील पोषणतत्त्वांमुळे चांगली झोप येण्यास मदत मिळेल आणि दुष्परिणामही होणार नाहीत.
(नक्की वाचा: Lack Of Sleep: कमी झोपल्यास होणारे भयंकर आजार)
काजू खाण्याचे हे देखील आहेत फायदे
- काजूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
- हृदयाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
- वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
- रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काजूचे सेवन करू शकता.
(नक्की वाचा: सावधान! या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला येतेय जास्त झोप, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )