जाहिरात

तीव्र उन्हाळ्यात मद्यपानामुळे मृत्यू? 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला; डॉक्टरांकडूनही सावधानतेचा इशारा

अनेकदा तीव्र उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून बियर रिचवल्या जातात. मात्र योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

तीव्र उन्हाळ्यात मद्यपानामुळे मृत्यू? 2 घटनांनी महाराष्ट्र हादरला; डॉक्टरांकडूनही सावधानतेचा इशारा

Deaths due to alcohol consumption during intense summer heat : सध्या महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अकोला आणि हिंगोलीत दोन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र वास्तव वेगळंच होतं. अधिक तपासानंतर या दोघांचे मृत्यू दारूचं सेवन आणि डिहायड्रेशनमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनुसार, त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होती. अकोल्यातील मृत व्यक्तीच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. दोन्ही मृतांची तपासणी केली तर दोघेही दारूच्या अंमलाखाली होते. दोघांच्याही शरीरात पाण्याचा अभाव होता. यातूनच दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

महाराष्ट्रातील या दोन घटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. उन्हाळ्यात सुट्टी पडली की कित्येक जण फिरायला जातात. यादरम्यान पार्टीही होते. सर्वसाधारणपणे तीव्र उकाड्यात मद्यप्रेमी थंडाव्यासाठी बियर आणि  व्हिस्कीचे बर्फ घातलेले पेग रिचवतात. मात्र प्रत्यक्षात याने तात्पुरचा दिलासा मिळत असला तरी याचे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसं पाहता एकंदरच मद्यपान करणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र तरीही मोठ्या संख्येने दारूचं सेवन केलं जातं. मात्र तीव्र उन्हाळ्यात मद्यपान करीत असाल तर अधिक सजग राहणं आवश्यक आहे.

उन्हाळ्यात मद्यपानामुळे नेमकं काय घडतं?

सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे. विदर्भात तर १५ एप्रिलला शाळांना सुट्टी देण्यात आली होती, तर अनेक कार्यालयांमधील वेळेत बदल करण्यात आले आहेत. अल्कोहोल घेतलेलं नसतानाही तज्ज्ञांकडून अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे Internal Medicine Expert डॉ. छाया वाजे यानी मद्यप्रेमींना अलर्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं, तीव्र उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून अनेकजण बिअरचा आधार घेतात, परंतु ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. उष्ण हवामानात शरीर आधीच डिहायड्रेशनच्या जोखमीमध्ये असते आणि अशावेळी अल्कोहोलचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण आणखी कमी होते. बिअरमुळे तात्पुरता थंडावा मिळाल्यासारखे वाटते, परंतु ती शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडवते, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी आणि गंभीर परिस्थितीत हिटस्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

नक्की वाचा - 1-2 पेग पिणं नॉर्मल असतं का? कमी दारू पिण्याचा शरीरावर कसा होतो परिणाम?

अल्कोहोलमुळे रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. उन्हाळ्यात बाहेर असताना, प्रवास करताना किंवा काम करताना शरीरावर आधीच ताण असतो, त्यामुळे या काळात बिअर किंवा कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याऐवजी भरपूर पाणी पिणे आणि नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचा पर्याय निवडणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. हलके आणि सहज पचणारे अन्न घेणे तसेच पुरेशी विश्रांती घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे म्हणजे केवळ तात्पुरता थंडावा मिळवणे नव्हे, तर सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्यायांची निवड करणे होय. त्यामुळे बिअरवर अवलंबून राहण्यापेक्षा निरोगी सवयी अंगीकारणे हा अधिक शहाणपणाचा निर्णय आहे


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com