LPG Cylinder Safety Tips in Summer: भारतात सध्या उन्हाळ्याची लाट पसरली असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. या कडक उन्हाचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही, तर घरातील सुरक्षिततेवरही होत आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलिंडर (LPG) उष्णतेमुळे अधिक धोकादायक ठरू शकतात. सिलिंडरमधील वायू दबावाखाली साठवलेला असतो, जो अतिउष्णतेमुळे प्रसरण पावून स्फोटाला निमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच, उन्हाळ्यात सिलिंडर हाताळताना खालील 5 नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
थंड आणि मोकळ्या जागेत सिलिंडर ठेवा
सिलिंडर नेहमी हवेशीर जागी आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावा. तो खिडकीच्या जवळ किंवा उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांजवळ ठेवू नका. बाल्कनीमध्ये सिलिंडर ठेवणे सुरक्षित असले तरी, त्यावर सावली असावी आणि तिथे हवा खेळती असावी.
पाइप आणि रेग्युलेटरची नियमित तपासणी
जास्त उष्णतेमुळे रबरच्या नळ्या (Gas Pipe) लवकर खराब होऊ शकतात किंवा त्यांना तडे जाऊ शकतात. आठवड्यातून एकदा साबणाच्या पाण्याचा फेस करून पाइप आणि रेग्युलेटरच्या जोडणीवर लावावा. जर बुडबुडे आले, तर समजावे की गॅस गळती होत आहे. अशा वेळी त्वरित पाइप बदलून घ्या.
(नक्की वाचा- DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)
आगीच्या स्त्रोतांपासून 5 फूट दूर अंतर
गॅस सिलिंडर आणि शेगडी, इलेक्ट्रिकल बोर्ड किंवा कोणत्याही उघड्या आगीमध्ये किमान 5 फुटांचे अंतर असावे. सिलिंडरजवळ पेट्रोल, स्प्रे किंवा इतर ज्वलनशील पदार्थ कधीही ठेवू नका. स्वयंपाक करताना पडदे किंवा प्लास्टिकच्या वस्तू शेगडीपासून दूर ठेवाव्यात.
बंद किंवा कोंदट जागेत साठवणूक टाळा
एलपीजी वायू हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे गळती झाल्यास तो जमिनीवर साचून राहतो. यामुळे बंद खोलीत स्फोटाचा धोका वाढतो. सिलिंडर कधीही जमिनीच्या खाली असलेल्या खड्ड्यात किंवा बंद कपाटात ठेवू नका. शेगडी नेहमी सिलिंडरच्या स्तरापेक्षा उंच प्लॅटफॉर्मवर असावी.
(नक्की वाचा- Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)
वापरानंतर रेग्युलेटर बंद करा
केवळ शेगडीचे बटण बंद केल्याने काम पूर्ण होत नाही, कारण पाइपमध्ये गॅस शिल्लक राहतो. स्वयंपाक झाल्यानंतर नेहमी सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करण्याची सवय लावा. रात्री झोपण्यापूर्वी रेग्युलेटर बंद करणे अनिवार्य आहे.
जर तुम्हाला गॅसचा वास आला, तर इलेक्ट्रिक बटणे चालू किंवा बंद करू नका. सर्व दरवाजे-खिडक्या उघडा, रेग्युलेटर बंद करा आणि त्वरित तुमच्या गॅस वितरकाशी किंवा आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा.