![Navratri 2024: नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस कधी? जाणून घ्या घट स्थापनेचा शुभ मुहूर्त Navratri 2024: नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस कधी? जाणून घ्या घट स्थापनेचा शुभ मुहूर्त](https://c.ndtvimg.com/2024-10/bfptvhb_ghatasthapana_625x300_02_October_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
Navratri 2024: शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबरपासून शुभारंभ होत आहे. परंपरेनुसार दुर्गा पूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते. घटस्थापनेनंतर पुढील 10 दिवस नवरात्रौत्सव जल्लोषात साजरा केला जातो. घटस्थापनेसह देवीमातेसाठी अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते. घट स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
घट स्थापनेचा शुभ मुहूर्त 2024
शारदीय नवरात्री पूजन अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला घट स्थापना करून केली जाते. पंचांगानुसार यंदा नवरात्रौत्सवास 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. घट स्थापनेसाठी सकाळी 6.30 वाजेपासून ते 7.31 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. तर घट स्थापनेचा अभिजात मुहूर्त दुपारी 12.03 वाजेपासून ते 12.51 वाजेदरम्यान आहे. या मुहूर्तादरम्यान घट स्थापना केली जाऊ शकते.
(नक्की वाचा: Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज)
शारदीय नवरात्र घट स्थापना विधी, या गोष्टी ठेवा लक्षात
1. घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा . चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी.
2. एक वेळूची टोपली चौरंगावर ठेवा. टोपलीमध्ये आपल्या शेतातील अथवा स्वच्छ माती भरावी आणि त्यामध्ये गहू पेरावे.
3. स्वच्छ धुतलेला मातीच्या घटाला लाल रंगाच्या लोकरीचे नऊ वेढे द्यावा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. त्यामध्ये पाणी, दुर्वा, सुपारी, पैसे, गंध, अक्षता टाकाव्या. विड्याची नऊ पाने आणि आंब्याच्या डहाळ्या देखील लावाव्यात.
4. घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या थाळीमध्ये तांदूळ भरून ठेवा.
5. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी आणि आरती करावी.
(नक्की वाचा: कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव, 3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत या विशेष कार्यक्रमांचे आयोजन)
6. रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी, घटास माळ चढवावी आणि आरती करावी.
7. नऊ दिवसात सर्व कुटुंबीयांनी मिळून 14 किंवा 28 पाठ दुर्गा सप्तशती संस्कृत/प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे.
8. कुलाचारप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा.
9. अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा, पूजा करावी. कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे. पुरणाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी.
(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)
10. नवमीच्या दिवशी संध्याकाळी आरती केल्यानंतर कुमारिका आणि सवाष्ण भोजन करावे. भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा.
11. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी जाताना घट, टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीमध्ये उगवलेले धान्य, आपट्याच्या पानासमावेत कुलदेवीला, कुलदैवत आणि घरातील ज्येष्ठांना द्यावे. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसामध्ये माळावेत. पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे.
12. घटाची माती आपल्या क्षेत्रामध्ये विसर्जित करावी.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Nashik| नवरात्रौत्सवात येवल्याचं जगदंबा माता मंदिर 24 तास खुलं राहणार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world