New Year 2026 Rules Change: नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणे नाही, तर तुमची खिशातील रक्कम, पगार, बँक व्यवहार आणि सरकारी फायदेही बदलतात. 1 जानेवारी 2026ची पहाट सर्वसामान्य लोकांसाठी अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे. काही लोक पगारवाढ होण्याची अपेक्षेत आहेत, तर काहींचे एखादे महत्त्वाचे कागदपत्र नसल्यास पैसे अडकूही शकतात. शेतकरी असो किंवा नोकरदारवर्ग, कर्ज घेणारे असो किंवा डिजिटल युजर हे बदल प्रत्येकावर थेट परिणाम करतील.
वेळीच ठोस पाऊल उचललं नाही तर दंडात्मक कारवाई, अडचणी आणि कामं उशीरानं होण्याचा फटका सहन करावा लागू शकतो. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 रोजी रात्रीच 1 जानेवारीपासून कोणकोणते नियम बदलणार आहेत? हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
1. PAN कार्ड आणि आधार कार्ड लिंक न केल्यास सर्व कामं अडकतील
1 जानेवारी 2026पासून सर्वात मोठी अडचण त्यांना येऊ शकते ज्यांनी पॅन कार्ड आणि आधार लिंक (PAN-Aadhaar Link) केलेले नाही. आधार-पॅन लिंक करण्याच्या प्रक्रियेची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 असेल, असे सरकारने स्पष्ट केले होते. या तारखेपर्यंत लिंक न झाल्यास तुमचा पॅन कार्ड निष्क्रिय (Inoperative) मानले जाईल. म्हणजे तुम्ही ITR फाइल प्रक्रिया करू शकणार नाही, परताव्याची रक्कम देखील अडकू शकते, बँकेशी संबंधित कामं रखडू शकतात आणि सरकारी योजनांचा लाभही मिळणार नाही. अंतिम मुदतीनंतर पॅन-आधार लिंक केल्यास 1000 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.
2. नवा इनकम टॅक्स फॉर्म, आता प्रत्येक खर्चावर नजर
जानेवारी 2026 मध्ये नवीन इनकम टॅक्स फॉर्म येण्याची शक्यता आहे. या फॉर्ममध्ये बँक व्यवहार आणि खर्चाची अधिक माहिती द्यावी लागेल. त्यामुळे ITR फाइल प्रक्रिया करणे सोपे होईल, पण चूक होण्याची शक्यता कमी राहील. म्हणजेच आता अचूक माहिती देणे आणखी महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या लोकांचे उत्पन्न आणि खर्च जुळणार नाहीत, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
3. नवीन वर्षात येणार नवा इनकम टॅक्स कायदा
नवीन वर्षासह कर व्यवस्थेत एक मोठा बदल निश्चित मानला जातोय. सरकार जुना इनकम टॅक्स कायदा 1961 रद्द करून नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. हा नवीन कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होऊ शकतो. कर प्रणाली सोपी करणे आणि न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हे या कायद्याचे उद्देश आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 हा कर नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
4. 8व्या वेतन आयोगामुळे पगार आणि पेन्शन वाढू शकते
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष खूप खास असणार आहे. केंद्र सरकारने आधीच 8व्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) मंजुरी दिलीय आणि 1 जानेवारी 2026 पासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे सुमारे 50 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. पगारवाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल, जो 2.15 ते 3.0 दरम्यान असू शकतो. असे झाल्यास मूळ पगारात 20 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. पगारासोबतच DA, HRA आणि पेन्शनमध्येही वाढ होईल.
5. पीएम किसानसाठी Farmer ID आवश्यक
जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असतील तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जानेवारी 2026 पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यासारख्या अनेक राज्यांमध्ये Farmer ID अनिवार्य केले जातेय. हे Farmer ID जमिनीच्या नोंदींशी जोडलेले असेल आणि संबंधित शेतकऱ्याची संपूर्ण डिजिटल माहिती त्यात उपलब्ध असेल. Farmer ID नसल्यास वर्षाला मिळणारी 6 हजार रुपयांची रक्कम थांबू शकते. पण ज्या राज्यांमध्ये ही प्रणाली पूर्णपणे लागू झालेली नाही, तिथे जुन्या लाभार्थ्यांना सध्या सूट दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
6. क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट होणारकर्ज घेतलेली मंडळी आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल येत आहे. आतापर्यंत क्रेडिट स्कोअर महिन्यातून एकदा अपडेट होत होते, पण वर्ष 2026 पासून तो दर सात दिवसांनी अपडेट होईल. तुम्ही वेळेवर EMI भरले असेल तर त्याचा फायदा लवकर दिसेल. पण एक दिवसाचाही उशीर झाल्यास स्कोअरवर त्वरित परिणाम होईल. याचा थेट परिणाम कर्ज मंजुरी आणि व्याज दरावर होईल.
7. बँक आणि FD दरांमध्ये बदल होऊ शकतोSBI, HDFC आणि PNB यासारख्या मोठ्या बँका व्याज दरांबाबत नवीन निर्णय घेऊ शकतात. नवीन FD दर आणि कर्जावरील व्याजदरांमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. ज्यांनी गुंतवणूक किंवा कर्ज घेण्याची योजना आखली आहे, त्यांच्यासाठी जानेवारी महत्त्वाचा महिना ठरणार आहे.
(नक्की वाचा: SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन )
8. LPG आणि गॅस सिलिंडरच्या किमती बदलू शकतातप्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. 1 जानेवारी 2026 रोजी घरगुती आणि व्यावसायिक LPG चे नवीन दर जाहीर होतील. किमतींमध्ये 30 ते 40 रुपयांपर्यंत दिलासा मिळू शकतो, असा अंदाज आहे. याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या बजेटवर होईल.
9. WhatsApp आणि Telegram वापरकर्त्यांसाठी कडक नियमडिजिटल वापरकर्त्यांसाठीही नवीन नियम येणार आहेत. बनावट अकाउंट आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकार मेसेजिंग अॅप्सवर कडक नियंत्रण आणतंय. नवीन नियमांनुसार फोन नंबर किमान 90 दिवस सक्रिय असणे आवश्यक असेल. याशिवाय वेब व्हर्जन दर सहा महिन्यांनी आपोआप लॉगआउट होऊ शकते. याचा उद्देश सायबर फसवणूक रोखणे हा आहे.
10. पेट्रोल, डिझेल आणि हवाई प्रवासावर परिणाम1 जानेवारी रोजी विमान इंधनाच्या (Aviation Fuel) किमतीही बदलल्या जातील. जर कच्च्या तेलाच्या किमती कमी राहिल्या तर विमान तिकीट स्वस्त होऊ शकतात. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही लक्ष ठेवले जाईल.
1 जानेवारी 2026 पासून लागू होणारे हे बदल कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम करणार आहेत. काही लोक पगारवाढीची वाट पाहतायेत, तर कुणाला पैसे अडकण्याची भीती आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वी पॅन-आधार लिंक करणे, बँक आणि टॅक्सशी संबंधित कामे पूर्ण करणे, नवीन नियमांसाठी स्वतःला तयार ठेवणे गरजेचे आहे. नवीन वर्ष तेव्हाच खऱ्या अर्थाने आनंद देतील, जेव्हा तुम्ही या बदलांसाठी आधीपासूनच तयार असाल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
