सुनील कांबळे, प्रतिनिधी
घरोघरी गणेशाची स्थापना (Ganesh Chaturthi 2024) झाली आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव, गौरी आवाहन, पूजन याची मोठी परंपरा आहे. आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या पुजनाने घरात सुख-शांती येते आणि विघ्न दूर होतं असं मानलं जातं. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत बाप्पा घरी आल्याचा आनंद पाहायला मिळतो. यानिमित्ताने राज्यातील 300 वर्ष जुन्या सिद्धिविनायक मंदिराचा (Latur Siddhivinayak Temple) इतिहास आपण पाहणार आहोत. निजामकालीन काळात स्थापन केलेल्या मंदिरात आज जोशी कुटुंबाची सहावी पिढी मनोभावे पूजा करते.
लातूरच्या जोशी वाड्यातील निजामकालीन मंदिराचा इतिहास
लातूर शहरातील राम गल्ली भागातील हेमंत वसंतराव जोशी यांच्या वाड्यात गेल्या 300 वर्षांपूर्वी निजामकाळात सिद्धिविनायक मंदिराची स्थापना करण्यात आली होती. हेमंत वसंतराव जोशी यांचे पूर्वज बाळाभाऊ जोशी निजाम काळी मोठे किर्तनकार होते. त्यांचा हा जुना वाडा आहे. त्यांच्याच काळात घरात सिद्धी विनायकाची स्थापना करण्यात आली होती. निजामकालीन सिद्धिविनायक मंदिराची स्थापना झाल्यापासून आजतागायत जोशी कुटुंबीय नित्य नियमाने पुजा अर्चा करते. निजामकालीन कीर्तनकार बाळाभाऊ यांच्यापासून ते अमेय हेमंत जोशी यांच्यापर्यंतची आजची नाव पिढी सुद्धा सिद्धी विनायकांची मनोभावे पूजा करते.
हे ही वाचा - Khuni Ganpati : मौलानाच्या आरतीशिवाय होत नाही विसर्जन; काय आहे धुळ्यातील 'खुनी गणपती'चा इतिहास?
सिद्धिविनायक मंदिरात अनेक विधिवत पूजा
सिद्धिविनायक मंदिराची स्थापना झाल्यापासून आजतागायत नियमित पूजा तर असतेच पण गणपती आवर्तने, गणपती घट, गणेश जयंती यासारख्या अनेक शुभ दिनी मनोभावे पूजा केली जाते. लातूरच्या अनेक जुन्या जाणत्या मंडळींचं हे श्रद्धास्थान आहे. 300 वर्षांपूर्वीचे जुने असलेले निजामकालीन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी लातूरमधील जुनी जाणती मंडळी आवर्जून येत असतात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, शैलेश पाटील चाकूरकर, लक्ष्मीकांत कर्वा यांसारखे दिग्गज मंडळी या सिद्धी विनायकाची दर्शनाला आवर्जून येत असत.
हे ही वाचा - सांगलीतील गावात मशिदीत बाप्पा विराजमान, या प्रथेचं अन् पुण्याच्या पानशेत धरणाचं आहे कनेक्शन
राज्यभरातून हजारो भाविकांची दर्शनासाठी रांग..
300 वर्ष जुनं मंदिर असल्याने राज्यभरातील अनेक श्रद्धाळू या सिद्धी विनायकाच्या दर्शनाला येतात. मालती जोशी सांगतात की, नवसाला पावणारा सिद्धी विनायक असल्याने हजारो भाविक श्रध्देने दर्शनासाठी येतात. तर काही जणांना प्रचिती सुद्धा आली असल्याचं सांगितलं जातंय. सिद्धिविनायक गणपती लातूरमधील सर्वात जुना गणपती असल्याचा दावा जोशी कुटुंब करतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world