- डॉ. कैशरीन खान, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे
Symptoms of UTI: उन्हाळी सुटी म्हणजे प्रवास, समुद्रावर फिरायला जाणे, कुटुंबासोबत मोठी सहल आणि पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेणे. मात्र याकाळात महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) अर्थात मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली. दीर्घ प्रवासादरम्यान लघवी रोखून धरणे, बराच वेळ ओल्या स्विमसूटमध्ये राहणे आणि पाणी कमी प्रमाणात पिणे या सवयी युटीआयचा धोका वाढवू शकतात. महिलांमधील मूत्रमार्ग आकाराने लहान असल्यामुळे जिवाणू मूत्राशयापर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे उन्हाळ्यातील काही दुर्लक्षित सवयी संसर्गास कारणीभूत ठरू शकतात.
अनेक महिला लांबच्या प्रवासात स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे लघवी बराच वेळ रोखून धरतात. त्यामुळे मूत्रमार्गातील जिवाणू बाहेर न पडता वाढू लागतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पोहून आल्यानंतर बराच वेळ ओल्या स्विमसूटमध्ये राहिल्यास जननेंद्रियांच्या जिवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते.
युटीआयची लक्षणे आणि दुर्लक्ष केल्यास होणारे परिणाम| Symptoms of UTI
- लघवी करताना जळजळ होणे
- वारंवार लघवीची भावना होणे
- दुर्गंधीयुक्त किंवा फेसाळ लघवी
- पोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवणे
अनेक महिला ही लक्षणे उष्णता किंवा शरीरातील पाण्याची कमतरता समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण वेळीच उपचार न केल्यास संसर्ग मूत्राशयातून किडनीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे ताप, पाठदुखी, मळमळ आणि उलट्या यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
(नक्की वाचा : Sleeping Habits Psychology: उन्हाळा असो वा हिवाळा, तुम्हाला झोपताना चादर लागतेच का? जाणून घ्या यामागील कारण)
संसर्ग वाढण्याची इतर कारणे| Other Factors Contributing to the Infection
उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे डिहायड्रेशन होऊन शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते आणि जिवाणू बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते. तसेच घट्ट कपडे, रासायनिक पदार्थांची समावेश असलेली स्वच्छता उत्पादने, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर आणि अस्वच्छता यामुळेही संसर्गाचा धोका वाढतो.
(नक्की वाचा : PMOS म्हणजे काय? 75% महिलांना ठाऊकच नाही गंभीर आजाराचं धक्कादायक वास्तव, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय)
बचावासाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि उपाययोजना | Expert Advice and Preventive Measures for UTIमहिलांनी दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिणे, लघवी दीर्घकाळ रोखून न धरणे, पोहून आल्यानंतर त्वरित कोरडे कपडे बदलणे, सैल आणि सूती अंतर्वस्त्रे वापरणे, तसेच वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान थोड्या थोड्या अंतराने विश्रांती घेऊन स्वच्छतागृहाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच पोहल्यानंतर किंवा लैंगिक संबंधांनंतर लघवी केल्यास जीवाणू बाहेर टाकण्यास मदत होते.
उन्हाळ्याचा आनंद घ्या, पण आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका. युटीआयची सुरुवातीची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन डॉ. खान यांनी केले.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world