Summer Health Tips: उन्हाळ्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांकडून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. या उष्णतेमुळे घराबाहेर पडणे तर दूरच, घरात बसूनही घाम फुटतो. अशा हवामानात घसा कोरडा पडणे आणि तहान लागणे ही सामान्य बाब आहे. पण पाणी पिऊनही थोड्याच वेळात पुन्हा तोंड कोरडे पडत असेल, तर या समस्येकडे तहान समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. अनेकदा 'कोरडे तोंड' (Dry Mouth) हे तुमच्या शरीरासाठी एक धोक्याचा इशारा असू शकतो. जाणून घेऊया यामागील मुख्य कारणे...
उन्हाळ्यात तोंड का कोरडे पडते?
1. डिहायड्रेशन (पाण्याचं प्रमाण कमी होणे)
सर्वात पहिले आणि मोठे कारण म्हणजे शरीर डिहायड्रेट होणे म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडते. जर शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रमाणात पाणी तुम्ही पीत नसाल, तर तोंडामध्ये लाळेची (Saliva) निर्मिती कमी प्रमाणात होते. लाळ तोंड ओलसर ठेवण्याचे आणि जंतूंशी लढण्याचे काम करते. तोंडातील लाळ कमी झाली की तोंड कोरडे पडू लागते.
2. मधुमेह (Diabetes)
वारंवार तहान लागणे आणि तोंड कोरडे पडणे ही मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर ती बाहेर काढण्यासाठी किडनीला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे वारंवार लघवीला लागते आणि शरीर डिहायड्रेट होते.
(नक्की वाचा: Bottle Gourd Dosa: दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा कुरकुरीत डोसा, वेटलॉसह मिळतील असंख्य फायदे)
3. औषधांचे दुष्परिणाम
जर तुम्ही बीपी (Blood Pressure), ॲलर्जी किंवा चिंता (Anxiety) कमी करण्यासाठी काही औषधे घेत असाल, तर त्यामुळेही तोंड कोरडे पडू शकते. अनेक औषधांमुळे लाळ ग्रंथी मंदावतात.
(नक्की वाचा: Pudina Chutney: पुदिना चटणी काळी पडण्याचे कारण 99% लोकांना माहिती नसणार, चटणी फ्रेश राहण्यासाठी वापरा या टिप्स)
तोंड कोरडे होण्याच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काय करावे?
- साध्या पाण्याऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा ओआरएस (ORS) प्यावे.
- कलिंगड, काकडी यासारख्या फळांचा आहारात समावेश करावा, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
- चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्समुळे शरीराचे डिहायड्रेशन वाढते, त्यामुळे उन्हाळ्यात ही पेय पिणे टाळा.
- पाण्यात पुदिन्याची पाने टाकून ठेवा. हे तुम्हाला फ्रेश ठेवेल आणि तोंडाचा कोरडेपणा कमी करेल.
(FAQs)
1. उन्हाळ्यात तोंड कोरडे होणे ही बाब सामान्य आहे का?
- कमी प्रमाणात तहान लागणे किंवा तोंड कोरडे होणे यासारख्या समस्या होणे सामान्य बाब आहे. पण वारंवार ही समस्या निर्माण होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये.
2. पाणी प्यायल्यानंतरही तोंड कोरडे होत असेल तर काय करावे?
- अशा परिस्थितीत ORS, नारळाचे पाणी आणि पाणीयुक्त फळांचा डाएटमध्ये समावेश करावा.
3. डॉक्टरांकडे कधी जावे?
- जर भरपूर पाणी पिऊनही अनेक दिवस तुमचे तोंड कोरडे पडत असेल, अन्न गिळताना किंवा काही गोष्ट चघळताना त्रास होत असेल किंवा तोंडात फोड येत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world