जाहिरात

Tulsi Vivah 2024: तुलसी विवाहचे काय आहे महत्त्व? सोहळ्याच्या यादीची करून घ्या नोंद 

Tulsi Vivah 2024: यंदा तुलसी विवाह कधी आहे? तुलसी विवाहचे महत्त्व काय आहे? पूजेच्या सामग्रीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आणणे आवश्यक आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

Tulsi Vivah 2024: तुलसी विवाहचे काय आहे महत्त्व? सोहळ्याच्या यादीची करून घ्या नोंद 

Tulsi Vivah 2024: तुळशीचे रोप (Tulsi Plant) अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीच्या रोपाला वृंदा (Vrinda) असेही म्हणतात. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी किंवा द्वादशी तिथीला भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामसोबत तुळशीचा विवाह (Tulsi Vivah) केला जातो. कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशी (Dev Uthani Ekadashi 2024) ही शास्त्रामध्ये अतिशय शुभ मानली गेली आहे, कारण या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रातून जागे होतात आणि शुभ कार्यक्रमांचा पुन्हा शुभारंभ होतो. तुळशी विवाह कधी आहे? त्याचे महत्त्व आणि लग्नासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी सविस्तर जाणून घेऊया.

तुलसी विवाहचे महत्त्व | Importance Of Tulsi Vivah

शास्त्रामध्ये तुलसी विवाहाची एक कथा आहे. तुलसी ही पूर्वी वृंदा होती आणि तिचा पती जालंधर हा राक्षस होता. वृंदा पतिव्रता असल्याने तिला तिच्या पतीचे रक्षण करण्याचे वरदान मिळाले होते. वृंदाला मिळालेल्या या वरदानामुळे देवांना जालंधरचा वध करणे शक्य होत नव्हते. त्यावेळेस देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जालंधरचा वध करण्यासाठी वृंदाचे पतिव्रत धर्म मोडले. भगवान विष्णू जालंधरचे रूप धारण करून वृंदाकडे गेले, त्यामुळे वृंदाचा पतिव्रत धर्म मोडला गेला आणि जालंधरचा वध झाला. यामुळे वृंदा खूप दुखावली गेली आणि संतापली. रागाच्या भरात तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूंनी देखील तिचा शाप स्वीकारला आणि त्यांचे शालिग्राममध्ये रूपांतर झाले. या शालिग्रामचीही भाविक पूजा करतात. वृंदाची भक्ती पाहून भगवान विष्णूंनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून दरवर्षी शालिग्राम आणि तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते.

कधी आहे  तुळशीचे लग्न | When Is Tulsi Vivah 2024

यंदा तुलसी विवाह 13 नोव्हेंबर रोजी आहे. याच दिवशी देव उठणी एकादशीही आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीची तिथी 12 नोव्हेंबर संध्याकाळी 4.04 मिनिटांपर्यंत आहे. यानंतर द्वादशी तिथीचा प्रारंभ होईल, द्वादशी तिथी 13 नोव्हेंबर दुपारी 1.01 वाजेपर्यंत आहे.  

तुलसी विवाह : तारीख आणि वेळ

तुलसी विवाह : बुधवार 13 नोव्हेंबर 
द्वादशी तिथी शुभारंभ : 12 नोव्हेंबर  संध्याकाळी 4.04 वाजेपासून 
द्वादशी तिथी समाप्त : 13 नोव्हेंबर दुपारी 1.01 वाजेपर्यंत 

यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त  

(नक्की वाचा: यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त)

तुळशी विवाहसाठी लागणारी सामग्री |  Tulsi Vivah Samagree 

घरामध्ये असणाऱ्या तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते. पण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या पूजेचे महत्त्व अधिक असते. साडी, वस्त्र नेसवून इत्यादी गोष्टींनी तुळशीचे रोपही सजवले जाते. तुळशी विवाह सोहळा आयोजित केल्यास तसेच तुळशीची पूजा केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख शांती निर्माण होते, असे मानले जाते.  

  • घरामध्ये तुळशीचे रोप आणि शालिग्राम असावे. 
  • भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा
  • चौरंग, चौरंगावरील वस्त्र, धूप दिवा, चंदन, हळद- कुंकू, हळकुंड, फुले, पुष्पाहार, बताशे, मिठाई, ऊस, कुरमुरे 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: