बाहेरचे सीलबंद पाणी पिणे किती सुरक्षित आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी एक थरकाप उडवणारी घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. रिया नावाची एक तरुणी ज्वेलरी खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली होती. खरेदी दरम्यान तिला तहान लागल्याने ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याने जवळच्या एका दुकानातून नामांकित ब्रँडची पाण्याची बाटली आणून दिली. मात्र, एक घोट घेताच तरुणीला झटका बसला. त्या बाटलीत शुद्ध पाण्याऐवजी चक्क अॅसिडसारखं द्रव भरलेल्याचं जाणवलं.
घोट घेताच किंचाळली तरुणी
मिळालेल्या माहितीनुसार, कन्फेक्शनरी दुकानदाराने आपल्या डीप फ्रीझरमधून पाण्याची बाटली काढून दिली होती. प्रचंड तहान लागलेली असल्याने रियाने बाटली उघडून कसलाही विचार न करता थेट पाणी प्यायले. मात्र, पाणी घशात उतरताच तिच्या तोंडात आणि घशात तीव्र जळजळ होऊन ती वेदनेने किंचाळली.
(नक्की वाचा- Kolhapur News: बाळाच्या बारशाची लगबग; नवरा, सासू-सासरे हॉल पाहायले गेले; आईने संपवलं आयुष्य)
तिने तातडीने दुकानातून बाहेर पळून तोंडात गेलेला तो धोकादायक द्रव बाहेर थुंकून दिला. मात्र, तोपर्यंत रसायनाचा अंश शरीरात गेल्याने तिची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी हायर सेंटरला रेफर केले आहे. सध्या तिच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
असा जीवघेणा प्रकार घडतो कसा?
अनेकदा काही टोळ्या किंवा स्क्रॅप माफिया जुन्या आणि कचऱ्यात फेकलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या गोळा करतात. या बाटल्या पुन्हा नवीन सारख्या चमकवण्यासाठी आणि त्यातील घाण काढण्यासाठी त्या तीव्र केमिकल किंवा अॅसिडने धुतल्या जातात. जर ही स्वच्छता योग्य पद्धतीने झाली नाही, तर त्या बाटलीमध्ये केमिकलचे तीव्र अंश किंवा अॅसिड तसेच राहून जाते. अशाच बाटल्यांमध्ये पुन्हा स्थानिक पातळीवर पाणी भरून, बनावट सील लावून नामांकित ब्रँडच्या नावाखाली बाजारात विकले जाते, जे निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतू शकते.
(नक्की वाचा- IMD Rain Alert: महाराष्ट्र पाऊस कधी परतणार? मान्सूनबाबत मोठी अपडेट; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज)
पाण्याची बाटली खरेदी करताना 'या' 5 गोष्टींची घ्या काळजी
- बाटली उघडताच आधी वास घ्या: बाहेरून घेतलेली पाण्याची बाटली उघडल्यानंतर सर्वात आधी तिचा वास घ्या. पाण्यातून किंवा बाटलीतून कोणत्याही प्रकारचा रासायनिक, तीव्र किंवा विचित्र वास येत असल्यास ते पाणी अजिबात पिऊ नका.
- बाटलीचे सील तपासा: बाटलीचे सील पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. सील तुटलेले किंवा सैल वाटल्यास ती बाटली खरेदी करू नका.
- पाण्याचा रंग आणि पारदर्शकता पहा: पाण्यात कोणताही कचरा, कण किंवा पाण्याचा रंग किंचितही बदललेला किंवा गढूळ वाटल्यास त्याचा वापर टाळा.
- चव वेगळी जाणवताच थुंका: पाण्याचा पहिला घोट घेताच जर त्याची चव विचित्र, कडू किंवा तोंडात जळजळ निर्माण करणारी वाटली, तर ते पाणी त्वरित थुंकून द्या आणि स्वच्छ पाण्याने तोंड धुवा.
- खाली बाटली नष्ट करा: पाणी पिल्यानंतर रिकामी झालेली प्लास्टिकची बाटली नेहमी चूरगळून कचराकुंडीत टाका, जेणेकरून ती बाटली पुन्हा रिफिलिंगसाठी वापरता येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world