IMD Rain Forecast: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रवासाबाबत अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या 6 दिवसांत मुसळधार पाऊस पाडून जूनची कसर भरून काढणाऱ्या मान्सूनने गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यात पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसामुळे निर्माण झालेली उघडीप आणि अचानक वाढलेल्या उन्हाच्या चटक्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे. काही भागांत दुष्काळी परिस्थितीची भीती व्यक्त होत आहे. कमाल तापमान 35 अंशांच्या वर गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र, भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
देशातील 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या बुलेटिननुसार, मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला आहे. आज भारतातील 17 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा'ऑरेंज/यलो अलर्ट' देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमधील काही भागांत पावसासोबतच प्रति तास 80 ते 85 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Kolhapur News: बाळाच्या बारशाची लगबग; नवरा, सासू-सासरे हॉल पाहायले गेले; आईने संपवलं आयुष्य)
महाराष्ट्रात विदर्भ-मराठवाड्याला दिलासा मिळण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून कोरड्या पडलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतीसाठी हा अंदाज अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
उत्तर महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात आज दाट ढगाळ वातावरण राहून पावसाचा जोर जास्त असेल.
(नक्की वाचा- Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन)
ऊन-सावल्यांचा खेळ आणि दमट हवामान
राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये आज सकाळपासून ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. पावसामध्ये खंड पडल्यामुळे जमिनीतील ओल सुकली असून हवेतील आर्द्रता वाढली आहे, ज्यामुळे कमाल तापमान 26 अंश ते 32 अंशावर असले तरी दमट व उष्ण हवामानामुळे नागरिकांना घामाच्या धारा सुटत आहेत. हवामान खात्याच्या मते, संध्याकाळनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये या कडक उन्हाच्या जागी ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world