Belly Fat Loss Tips: वाढणारे पोटे आज अनेक लोकांसाठी सर्वात मोठी समस्या ठरत आहे. सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी कोणी जिम जॉइन करते, कोणी सकाळ-संध्याकाळ वॉक करतात तर अनेक लोक सर्वात आधी आपल्या ताटातील खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करतात. जे आधी पाच ते सहा पोळ्या खायचे, ते स्वतःला केवळ दोन पोळ्यांपुरते मर्यादित ठेवतात. पण तरीही पोटाची समस्या जैसे थेच असते. "मी फक्त दोन पोळ्या खातो, तरीही पोट का वाढत आहे?" असा प्रश्न मनात डोकावणे साहजिकच आहे. जर तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल तर याचे उत्तर फक्त पोळ्यांच्या संख्येत नाही तर तुमच्या संपूर्ण लाइफस्टाइलमध्ये दडलेले असू शकते.
ताटातील पोळ्या कमी केल्याने पोट आत जाणार नाही
पोट वाढण्यामागील सर्वात मोठे कारण पोळ्या असतं, असा अनेकांचा गैरसमज आहे. म्हणूनच ही मंडळी सर्वात आहारात कमी प्रमाणात पोळ्यांचा समावेश करतात. खरंतर वजन आणि पोट वाढणे फक्त तुम्ही किती पोळ्या खाता यावर अवलंबून नसते. त्याऐवजी दिवसभरात शरीरामध्ये किती प्रमाणात कॅलरीज् जात आहेत आणि शरीर किती प्रमाणात कॅलरीज् खर्च करत आहे? हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही दोनच पोळ्या खात असाल पण संपूर्ण दिवस खुर्चीवर बसून काम करता आणि शरीराची हालचाल खूप कमी होत असेल तर कॅलरीज् खर्च होऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत पोटाची चरबी कमी होण्याऐवजी वाढूही शकते. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे चालणे किंवा अन्य प्रकारच्या शारीरिक हालचाली करणे आवश्यक मानले जाते.
पोळी कमी पण अन्य गोष्टी जास्त प्रमाणात खाणे?
अनेक लोक पोळ्या दोनच खातात, पण दिवसभर चहासोबत बिस्किटं, मिठाई, कोल्ड ड्रिंक किंवा तळलेले पदार्थही खातात. अशा वेळी एकूण कॅलरीज् पूर्वी इतक्याच किंवा त्याहून जास्त प्रमाणात पोटात जातात. त्यामुळे फक्त पोळ्या मोजून फायदा होणार नाही? संपूर्ण आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.
(नक्की वाचा: Uric Acid Control Tips: 'मी फक्त डाळ खातो,तरीही युरिक अॅसिड का वाढतंय?' जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)
डाएटमध्ये प्रोटीन कमी असेल तरीही अडचण
जर तुमच्या ताटात फक्त पोळी आणि भाजी असेल पण डाळ, दही, पनीर, अंडे किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ कमी असतील तर लवकर भूक लागू शकते. यामुळे वारंवार काही ना काही खाण्याची सवय लागते, जी वजन वाढण्याचे कारण बनू शकते.
इतकेच नाही तर जर दररोज पुरेशी झोप मिळत नसेल किंवा सतत मानसिक ताणतणावात असाल तर याचा परिणाम शरीराच्या हार्मोन्सवर होऊ शकतो. अनेक रीसर्चमधील माहितीनुसार, अशा परिस्थितीत पोटाभोवती चरबी जमा होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणूनच फक्त जेवण कमी करणे पुरेसे नाही तर चांगली झोप आणि तणावावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
(नक्की वाचा : गोड रसाळ फळात लपलंय 'हे' धोकादायक रसायन, कसं आणि कोणत्या वेळेस खाल्ल्यास बनते विष? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा)
वय वाढण्यासोबत लाइफस्टाइलवरही लक्ष देणे गरजेचे
जसजसे वय वाढते तसे शरीराचा कॅलरीज् खर्च करण्याचा वेग हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणूनच पूर्वी जितके जेवण तुम्ही खात होतात, तेच आता वजन वाढण्याचे कारण बनू शकते. अशा वेळेस फक्त पोळी कमी करण्याऐवजी संपूर्ण लाइफस्टाइलवर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.
त्यामुळे जर तुम्हाला खरोखरच पोट कमी करायचे असेल तर फक्त पोळ्या मोजणे सोडा. संतुलित आहार घ्या, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढवा, रोज अॅक्टिव्ह राहा, पुरेशा प्रमाणात झोप घ्या आणि वारंवार स्नॅक्स खाणे टाळा. लक्षात ठेवा पोट फक्त दोन पोळ्यांमुळे वाढत नाही तर अनेक छोट्या-छोट्या सवयींचाही शरीरावर परिणाम होत असतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)