योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आस्टूल ग्रामपंचायतीत आयोजित विशेष ग्रामसभेत मोठा वाद निर्माण झाला आहे. या ग्रामसभेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामसभा हा घटनात्मक कार्यक्रम असताना बाबासाहेबांचा फोटो नसणे ही गंभीर बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, ग्रामसभेत कोणत्याही महापुरुषांचा फोटो नसल्याचा दावा करण्यात येत असून, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी सम्राट अशोक सेनेचे संस्थापक आकाश शिरसाट यांनी मंत्री गिरीश महाजन यांनाही इशारा दिल्याचे समोर आले आहे.
व्यवस्थापक आणि शाळेतील कार्यक्रमावर आमदारांची टीका..
या दरम्यान, अकोल्यातील अमृत कलश विद्यालय, खडकी येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमस्थळी ना क्रांतिकारकांचे फोटो, ना घटनेचा सन्मान, ना देशभक्तांच्या प्रतिमा दिसून आल्याने कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “याला प्रजासत्ताक दिन म्हणायचा की आणखी काही?” असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी शाळा व्यवस्थापन व प्रशासनावर थेट टीका केली आहे. पुढील पिढीच्या मनात आपण काय रुजवत आहोत, याचे भान नसलेल्या संस्थाचालकांना कोणता पुरस्कार द्यावा, असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून उपस्थित केला आहे.
बार्शीटाकळीच्या तहसील कार्यालयातील प्रोटोकॉल भंग...
या दोन घटनांनंतर तिसरी गंभीर घटना अकोल्याच्या बार्शीटाकळी तहसील कार्यालयात घडली आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत प्रोटोकॉलचे पालन न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ध्वजवंदन न करता ध्वजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रगीत अर्धवट वाजवण्यात आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना विचारणा केली असता, त्यांनी पत्रकार व नागरिकांसमोर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची दखल घेत पालकमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले असून, प्रजासत्ताक दिन वादाचा विषय ठरल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world