पालकांची मुलांना नेहमीच चांगली सवय लावण्यासाठी धडपड सुरु असते. धाकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्यामुळे लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागते. यामुळे ते पुस्तकी अभ्यासपासून दूर जात असल्याची चिंता अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. काही महिन्यांच्या मुलांना नीट वाचता बोलता पण येत नाही परंतू धुळे शहरातील ही बातमी तुम्हाला अचंबित करेल. अवघ्या पाच महिन्यांच्या वेदांशची कौतुकास्पद कामगिरीसाठी 'कलाम वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.
वेदांश हा धुळे शहरातील वैभव व प्रतिक्षा सोनगिरे यांचा मुलगा आणि प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेल्या अनिल गंगाधर सोनगिरे यांचा नातू आहे. सोनगिरे कुटुंबीयांनी मुलाची स्मरणशक्ती ओळखत त्याला विविध गोष्टींचे चित्र दाखवून त्याची ओळख पटवायला शिकवले. अवघ्या 5 महिन्यांच्या वेदांशने ते सहजपणे आत्मसात करुन घेतले. त्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक केले जात आहे. त्याची चांगली स्मरणशक्ती पाहुन त्याच्या विक्रमासाठी त्याला 'कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड' जाहिर झाला आहे. एवढ्या कमी वयात त्याच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
वेदांशला एखादी गोष्ट दाखवली की, ती गोष्ट सहज त्याच्या लक्षात राहते हे त्याच्या पालकांना लक्षात येताच, त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे त्याने सहजपणे त्या आत्मसात केल्या. त्याच्या पालकांनी त्याला एबीसीडी, विविध मुळाक्षरे, 16 हून अधिक देशांचे राष्ट्रध्वज, प्राण्यांची, फळांची, फुलांची, पक्ष्यांची, भाज्यांची, विविध रंगांची नावे, 1 ते 20 पर्यंतचे अंक, महापुरुषांची नावे त्यांची माहिती हे सर्व त्याला सांगितले आणि त्याने लगेच ते सर्व लक्षात ठेवले. टीव्ही आणि मोबाईल पासून मुलांना लांब ठेवल्यास त्यांच्या सुप्त गुणांचा मागोवा घेता येईल अशी आशा वेदांशच्या पालकांनी व्यक्त केली.
चांगली स्मरण शक्ती असलेल्या मुलांसाठी कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड दिला जातो, अशी माहिती वेदांशच्या पालकांना मिळताच त्यांनी त्याबाबत महिती घेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले. त्यावेळी त्यांना वेदांशचे व्हिडिओ देण्यास सांगितले. त्याच्या पालकांनी महापुरुषांचे फोटो, भाज्यांचे प्रकार, विविध देशांचे झेंडे ओळखतानाचे व्हिडिओ पाठवले. वेदांशची तल्लख बुद्धी पाहता, त्याचे नामांकन स्वीकारत अवघ्या ५ महिन्यांच्या असलेल्या वेदांश सोनार या चिमुकल्याची नोंद कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.