माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (Ashok Chavan joined BJP) जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांनी काँग्रेलला राम राम ठोकला. नांदेड जिल्ह्यावर (Nanded News) कंट्रोल असलेला काँग्रेसचा एकमेव चेहरा असलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसकडून लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) चाचपणी सुरू झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना आपल्या बालेकिल्ल्यातून पराभव पचवावा लागला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रतापराव चिखलीकर 4,82,148 मतांनी विजयी झाले होते. यावेळी अशोक चव्हाणांना 4,42,138 मतं पडली होती. अवघ्या 40,000 मतांच्या फरकाने अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. भाजपने नांदेडमधून अशोक चव्हाणांना पराभव केल्यानंतर त्यांना भाजपमध्ये का सामील करून घेतलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
अशोक चव्हाणांचा हातून नांदेड कसा निसटला?
2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. 2009 लोकसभा निवडणुकीत भास्करराव खतगावकर पाटील 3,46,253 मतांनी विजयी झाले होते. भाजपचे संभाजी पवार 2,71,610 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण 4,91,292 मतांनी विजयी झाले होते. यावेळी भाजपचे डी. बी. पाटील 4,10,454 दुसऱ्या क्रमांकावर होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र हे चित्र पालटलं आणि भाजपचे प्रतापराव चिखलीकर 4,82,148 मतांनी विजयी झाले होते. यावेळी काँग्रेसच्या अपयशामागे वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना तिसऱ्या क्रमांकांची 1,65,341 मतं मिळाली होती. वंचितमुळे नांदेडमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता.
एकदा हरवलं तरीही भाजपला अशोक चव्हाणांची गरज का?
गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी अशोक चव्हाणांचा नांदेड आणि जवळच्या जिल्ह्यांवर चांगली पकड असल्याचं नाकारता येत नाही. आतापर्यंत विलासराव देशमुखांकडे मराठवाड्यातील मोठा नेता म्हणून पाहिलं जात होतं. मात्र त्यांच्या निधनानंतर अशोक चव्हाणांकडे मराठवाड्याचा नेता म्हणून पाहिलं जात आहे. अगदी ग्रामपंचायत, विधानसभेवर अशोक चव्हाणांचं वर्चस्व पाहायला मिळतं.
भाजपने अशोक चव्हाणांना गळाला लावण्यामागील चार महत्त्वाची कारणं
1. मराठवाड्यातील मोठा नेता गळाला लावणे: अशोक चव्हाणांची राजकीय पकड केवळ नांदेड नाही तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांवर दिसून येते. त्यामुळे या निमित्ताने चांगलं नेटवर्क असलेला मराठवाड्यातील नेत्याला भाजपमध्ये सामील करून घेता आला.
2. पंकजा मुंडेंना समांतर नेतृत्व: सध्या मराठवाड्यात भाजपचा चेहरा म्हणून पंकजा मुंडेचं नाव घेतलं जातं. मात्र पंकजा मुंडे अपेक्षित नेतृत्व उभ्या करू शकलेल्या नाहीत. अशावेळी त्यांना समातंर नेतृत्व उभा करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं दिसतं.
3. मराठा नेतृत्व: भाजपच्या चिखलीकरांचा नांदेडमध्ये अपेक्षित प्रभाव दिसत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील प्रभावी मराठा चेहरा म्हणूनही अशोक चव्हाणांकडे पाहिलं जातं. दुसरीकडे पंकजा मुंडे ओबीसी चेहरा म्हणून सोबत असताना यात एक मराठा नेतृत्व असल्यास परिणामकारक ठरेल म्हणून अशोक चव्हाणांना भाजपने सोबत घेण्याचा निर्णय घेतला असावा.
4. मराठवाड्यातील जिल्ह्यांवर वर्चस्व: विलासराव देशमुखांनंतर मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून अशोक चव्हाणांकडे पाहिलं जातं. अशोक चव्हाणांचा प्रभाव केवळ नांदेडपुरता मर्यादित नाही. लातूर, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही अशोक चव्हाणांचं कंट्रोल असल्याचं दिसून येतं.