ईव्हीएम विरोधी आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव केंद्रबिंदू बनला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आज मारकडवाडी या गावाला भेट दिली आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा मारकडवाडीत जाणार आहेत. मारकडवाडीमध्ये राहुल गांधी लॉन्गमार्च सुद्धा काढणार असल्याची शक्यता काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रज्ञा सातव यांनी वर्तवली आहे. ईव्हीम विरोधातील देशातील लढ्याच केंद्र आता मारकडवाडी बनत आहे. याच मारकडवाडीत शरद पवार येऊन गेले. आणि पवारांनी थेट मारकड वाडीचे रेकॉर्ड आपण पंतप्रधान यांच्या पर्यंत घेऊन जाऊ. तुम्ही ईव्हीएम विरोधात ठराव करा. असे सांगितले. यानिमित्ताने देशातील ईव्हीएम विरोधातील लढ्याचा चेहरा शरद पवार होऊ पाहत आहेत.
नक्की वाचा - शरद पवारांचे मारकडवाडीत जावून फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांचा मारकडवाडी दौऱ्यात काय घडलं?
शरद पवार हे राजकीय पोकळीचा पुरेपूर वापर करणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. पवारांचे राजकीय चातुर्य आणि एखाद्या गोष्टीची पोकळी भरून काढण्याचे कसब शरद पवार यांच्याकडे आहे. हेच राजकीय कसब शरद पवार मारकडवाडी गावातील ईव्हीएम विरोधी लढ्यातून परत एकदा देशाच्या राजकारणात पुढे आणू पाहत आहेत. शरद पवार मारकडवाडीत येण्यापूर्वीच संपूर्ण मारकडवाडीत ईव्हीएम हटाव देश बचाओ...अशा आशयाचे पोस्टर लागले होते. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांचे पोस्टर लागलेले दिसले. अशातच शरद पवारांचे आगमन झाले. दहावीतील मुलींपासून ते काही महिला आणि नागरिकांनी थेट शरद पवार यांच्यासमोर गावच्या मतदानासंदर्भातील कैफियत मांडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तर उत्तम जानकर यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा करत माळशिरसमध्ये पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली. मात्र जानकर यांच्या राजीनामाच्या घोषणेला जयंत पाटील यांनी तात्काळ खो दिला. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही राजीनामा देऊ नका असा थेट सल्ला जयंत पाटील यांनी दिला. त्यामुळे उत्तम जानकर यांच्या राजीनाम्याचे नाट्य शरद पवारांसमोरच मारकडवाडीत पाहायला मिळाले. ईव्हीएम विरोधातील लढ्यामध्ये येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची जाहीर मागणी जयंत पाटील यांनी केली. तर याच मागणीला मारकडवाडी ग्रामस्थांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
नक्की वाचा - बॅलेटवर मतदान घेण्याचा मारकडवाडीचा निर्णय का? गावकरी काय म्हणाले?
मारकडवाडी येथे शरद पवार यांनी केलेल्या भाषणात थेट जमावंदी कायद्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले. भाषण करण्याच्या स्वातंत्र्यावर देखील पोलीस आता कायदा लागू करणार का? असा प्रश्न शरद पवारांनी केला. तर मारकडवाडी गावात दाखल झालेले गुन्हे आणि 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपर वरील मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात झालेल्या प्रयत्नांचे रेकॉर्ड मला द्या. आपण ते निवडणूक आयोग पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू, असेही पवारांनी सांगितलं. मात्र या सर्वांमध्ये शरद पवार यांनी आपण मुख्यमंत्र्यांनाही मारकडवाडीत जाण्यासंदर्भात विनंती करू, असेही भाषणात सांगितले. त्यामुळे पवारांचे भाषण एक प्रकारे मारकडवाडी ग्रामस्थांना जरी बुस्टर ठरत असेल. तरी भाजप विरोधी असलेल्या ईव्हीएमचे पुरावे पवार भाजपच्याच पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना देणार का? हा सवाल या निमित्ताने पुढे आला.