सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Ahilyanagar Tragedy: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे, जिथे दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावे सार्थक गणपत बढे (वय 19) आणि सुरेखा गणपत बढे (वय 18) अशी आहेत. ते दोघेही कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील रहिवासी होते.
काय आहे प्रकरण?
शनिवारी (15 नोव्हेंबर 2025) रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सार्थक आणि सुरेखा हे त्यांच्या आईसोबत चांदेकसारे शिवारातील दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्याजवळ मेंढ्या धुण्यासाठी गेले होते. त्यांची आई मेंढ्या धुण्याचे काम करत असताना, हे दोघे भाऊ-बहीण त्यांना मदत करत होते. याच वेळी, दुर्दैवाने दोघांचाही पाय घसरला आणि ते खोल पाण्यात पडले.
( नक्की वाचा : Kalyan News : 'तो' डॉक्टर गप्पा मारत बसला, रूग्ण तडफडत राहिला, कल्याणच्या हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना )
ही भयानक घटना आईच्या डोळ्यांसमोर घडली. त्यांनी तातडीनं आरडाओरडा करून स्थानिकांना मदतीसाठी बोलावले. नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, परंतु नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचण्यापूर्वीच दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांनी कायदेशीर पंचनामा पूर्ण केला आणि त्यानंतर अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिसांकडून सुरू आहे.
बढे कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला असून, ही दुर्घटना सर्वांना चटका लावणारी ठरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world