रामराजे शिंदे
महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू आणि संभाजी राजे छत्रपती यांनी एकत्र येत तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके यांनीही आपण आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सव्वा दोनशेपर्यंत जागा लढवणार असल्याचे सांगत आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना आणखी एक नवी युती होईल आणि एक 'सुपारी आघाडी' जन्माला येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार हे गुरुवारी दिल्ली दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तिसरी आघाडी उभी करण्याचे काम हे अजित पवारच करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून अजित पवार महाविकास आघाडीची मते खाण्याचा प्रयत्न करत असल्याचे रोहित पवारांनी म्हटले. त्यांनी म्हटले की येत्या काळात अजित पवार आणि राज ठाकरे एकत्र येतील आणि सुपारी घेऊन मतं खाण्याचे हे दोघे काम करतील असे रोहित पवारांनी म्हटले. जे पक्ष निवडून येण्यासाठी नव्हे तर मतं खाण्यासाठी निर्माण होतात त्यांच्यामागे मतदार जात नाहीत असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
अजित पवारांचे राज ठाकरेंकडून कौतुक
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे कौतुक केले होते. शरद पवारांनी कायम जातीपातींमध्ये विष कालवण्याचे काम केले मात्र अजित पवारांनी तसे कधीही केले नाही असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मराठवाडा दौऱ्यावर असताना जालन्यामध्ये राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणत शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. याला विरोध करण्यासाठी मनसैनिकांनी ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गाडीवर नारळफेक केली होती. शिवसेना उबाठा पक्षाकडून राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणून हिणवलं जात असून आता हाच शब्द वापरत रोहित पवारांनी राज ठाकरेंसह अजित पवारांवरही टीका करण्यास सुरुवात केली आहे.