Ajit Pawar Death News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलंय. अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट करत म्हटलंय की, "आमदार श्री रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना नुकतच याबाबत मी स्वत:भेटून पत्र दिले आहे. माननीय मुख्यमंत्री त्यांच्या अत्यंत जवळच्या व तितक्याच विश्वासु मित्राच्या घातपाती मृत्यु व त्यामागील षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबद्दल माझ्या मनात दुमत नाही." अमोल मिटकरी यांनी सुपुर्द केलेल्या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात आणि खरंच अपघात प्रकरणाची चौकशी बाह्य यंत्रणेकडे सोपवली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पत्रामध्ये अमोल मिटकरी यांनी काय नमूद केलंय, हे समजू शकलेले नाही.
यापूर्वी अमोल मिटकरी यांनी VSR कंपनीने डिसेंबर 2025च्या महिन्यात आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा उतरविल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती ऐकण्यात येतेय, अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death:'पंगतीत सोबत, मग चौकशीबाबत गप्प का?' तटकरे-पटेल यांच्या 'सायलेन्स'वर कराळे गुरुजींचा मोठा वार)
रोहित पवार यांनाही घातपाताचा संशय
अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात असल्याचा संशय अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. मंगळवारी (10 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सविस्तर सादरीकरण करत अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न तसेच शंका उपस्थित केल्या. सत्य समोर येण्यासाठी विमान भाड्याने देणाऱ्या व्हीएसआर कंपनीसह संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक तज्ज्ञांमार्फत आणि विशेषतः फ्रान्स, अमेरिका किंवा युकेमधील तज्ज्ञ एजन्सींकडून चौकशी करण्याची मागणीही रोहित पवार यांनी केलीय.
(नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash: 2 मिनिटांत खेळ बदलला! रोहित पवारांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा)
अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू
बारामतीजवळ झालेल्या या विमान अपघाताच्या ठिकाणी बुधवारी (11 फेब्रुवारी) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चार सदस्यांच्या पथकाने भेट दिली. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, 28 जानेवारी रोजी झालेल्या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओंची त्यांनी तपासणी केली.