महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्या बारामतीने त्यांना राजकारणात ओळख दिली आणि नेहमी साथ दिली, त्याच मातीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नक्की वाचा: Ajit Pawar Plane Crash CCTV Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे CCTV फुटेज समोर
प्रचारासाठी बारामतीत होता भरगच्च कार्यक्रम
अजित पवार आज सकाळी 8:10 वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते. पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीत चार महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी साधारण 8:45 च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना त्यांचे छोटे विमान कोसळले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजित पवारांच्या नावे आहे अनोखा विक्रम
अनंतराव आणि आशाताई यांचे पुत्र असलेल्या अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची त्यांनी सहकारी साखर कारखान्यापासून केली. 1991 मध्ये ते पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. मात्र, शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री झाल्यामुळे त्यांनी ती जागा काकांसाठी रिकामी केली. त्यानंतर 1991 पासून ते आजतागायत बारामती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. राजकारणात 'दादा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी आपल्या स्वतंत्र नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामतीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. 'विकासपुरुष' ही त्यांची प्रतिमा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे नाते, शिस्तप्रियता, वेळेचा पक्केपणा, सकाळीच उठून कामाला सुरूवात करणे आणि अखंडपणे काम करत राहणे हीच त्यांची मुख्य ताकद होती.
नक्की वाचा: Ajit Pawar Death: अजित पवारांसोबत विमानात कोणकोण होते? नेमके काय घडले ?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यापूर्वी दादांची एक्झिट
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र लढवल्या होत्या. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदांमुळे कार्यकर्तेही सुखावले होते. मात्र, पक्ष विलीनीकरणाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच नियती अजित पवारांना हिरावून घेतलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world