Praful Patel reaction on Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला २० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. अद्यापही त्यांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा अहवाल कळू शकलेला नाही. दरम्यान रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत दादांच्या अपघातामागे घातपात असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन आल्याचं म्हटलं होतं. दरम्यान प्रफुल पटेल यांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन गेला होता असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांनी आज प्रतिक्रिया दिली. मी दिल्लीत होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाराच्या संदर्भात मी त्यांना फोन केला होता. यावर दादांनीही मी नक्कीच चुकाऱ्यांची व्यवस्था करतो असं म्हटलं होतं, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.
रोहित पवारांनी केलेल्या आरोपावर प्रफुल पटेल यांची सावध प्रतिक्रिया...
रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर एक हादरवणारा आरोप केला. पायलटने अजित दादांचे विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली असून मी फार जबाबदार व्यक्ती असून राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मी फार संयमाने बोलेल आणि माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाही. तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.