
Beed News : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे.बीड येथे बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेनंतर आता अजित पवारांनीही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण देण्याला आपला कोणताही विरोध नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
अजित पवारांची स्पष्ट भूमिका
अजित पवार म्हणाले की, "राजकारण करताना मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. मी फक्त माणूस पाहतो आणि मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते."
“ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचा दुमत असण्याचे कारण नाही. जे कोणी यातून राजकारण करत असतील, त्यांना आवर घालण्याची गरज आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं होतं?
खासदार सुप्रिया सुळे यांनी एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, आरक्षण त्यांच्यासाठी असले पाहिजे ज्यांना खरोखरच त्यांची गरज आहे. मी आरक्षणाची मागणी करू शकत नाही कारण माझे पालक सुशिक्षित आहेत, मी सुशिक्षित आहे आणि माझी मुले सुशिक्षित आहेत. मी त्यासाठी अर्ज केला तर मला लाज वाटली पाहिजे.आरक्षण हे अशा लोकांसाठी आहे ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नसेल आणि त्यांना त्याची गरज असेल. आपण या देशातील प्रत्येकाला याबद्दल त्यांचे काय मत आहे हे विचारले पाहिजे आणि त्यावर खुली चर्चा केली पाहिजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world