योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील नासीर खान रहबर खान या शेतकऱ्याने सुमारे 10 एकर शेतीवर सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी, बी-बियाणे, खते, औषधे अशा विविध कामांवर त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्च केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे त्यांच्या संपूर्ण शेतीतील पिके वाहून गेली.
शेतीसाठी लाख रुपयाचा खर्च, मात्र तरीही पदरी निराशा!
या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. निराशेच्या भरात नासीर खान यांनी नष्ट झालेल्या पिकावर थेट ट्रॅक्टर फिरवला. यामुळे त्यांचे मनोबल किती खच्ची झाले आहे, हे स्पष्टपणे दिसून आले. त्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली असून, भरपाई मिळाल्यास पुन्हा शेती करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
नक्की वाचा - Maharashtra Rain : आभाळ फाटलं, शेती पाण्याखाली; महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा
यादरम्यान, हातरूण परिसरासह आसपासच्या शेतकऱ्यांनाही सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन आणि तूर यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन केलेली शेती काही तासांच्या पुराच्या पाण्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.
सध्या शेतकरी मोठ्या संकटात असून त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. पीक विम्याच्या योजनाही तत्काळ राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकरी वर्गात अधिक नाराजी निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी नासीर खान यांचा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.