योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News :अकोला शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गीता नगर परिसरात राहणाऱ्या एका अवघ्या 13 वर्षांच्या शाळकरी मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले. ही घटना, शुक्रवारी (5 डिसेंबर) रोजी उघडकीस आली. इतक्या लहान वयात तिने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण वस्ती आणि अकोला शहर हादरून गेले आहे. परिसरात शोककळा पसरली असून, 'अशी वेळ त्या कुटुंबावर यावीच का?' असा संतप्त सवाल मृत मुलीच्या कुटुंबीयांसह शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
शाळेतील त्रासाचे गंभीर आरोप
या घटनेनंतर मृत मुलीच्या कुटुंबीयांनी अकोला शहरात धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी ज्या शाळेत शिकत होती, तेथील सीनियर वर्गातील एका विद्यार्थ्याकडून तिला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता. कुटुंबाचा असा दावा आहे की, छेडछाड, टोमणे आणि मानसिक दडपण यामुळे मुलगी गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. 'माझ्या मुलीला जगायचंच राहिलं नाही,' असा आक्रोश करत मुलीच्या वडिलांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांशी जबरदस्तीनं जवळीक, 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी आली होती, त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. तिचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. याच दरम्यान, गीता नगर भागातील घरातील दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत तिने आतून कडी लावून गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. काही वेळाने कुटुंबीय घरी परतले. हाका मारूनही मुलीकडून प्रतिसाद न मिळाल्याने, शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब कोसळून पडले.
या प्रकरणाची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सध्या आकस्मित मृत्यूची नोंद केली असून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांनी माहिती दिली की, वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मात्र, आत्महत्येमागील कारण स्पष्ट होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world