जाहिरात

Akola News: अकोला महापालिकेत मोठी उलथापालथ! 4 नगरसेवक फुटले, गटनेता बदलला; ठाकरेंच्या पक्षाला सुरुंग

Akola News : अकोला महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे

Akola News: अकोला महापालिकेत मोठी उलथापालथ! 4 नगरसेवक फुटले, गटनेता बदलला; ठाकरेंच्या पक्षाला सुरुंग
Akola News : या पक्षांतरामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : अकोला महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडत शिंदे गटाने मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे महापालिकेतील सत्तेची आणि वर्चस्वाची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या पक्षांतरामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, शिंदे गटाने मात्र आपले पारडे जड झाल्याचा दावा केला आहे.

बहुमताच्या जोरावर गटनेता बदलला

या राजकीय घडामोडींनंतर गटनेतेपदाचा पेच निर्माण झाला होता. शिंदे गटात सामील झालेल्या नगरसेवकांनी आपली ताकद दाखवण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बहुमताच्या जोरावर आक्रमक पाऊल उचलत, आतापर्यंत गटनेतेपद भूषवणारे विजय इंगळे यांची हकालपट्टी करण्यात आली. 

त्यांच्या जागी सागर भारुका यांची नवीन गटनेते म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे पदाधिकारी मंगेश काळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात आता शिंदे गटाचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

( नक्की वाचा : Amravati News: तिजोरीत 40 कोटी, पण जनतेच्या नशिबी कुपोषण आणि पायपीट! अमरावती ZP बजेटवर टीका का होतीय? )

ठाकरे गट आक्रमक

आपल्याच सहकाऱ्यांनी बंडखोरी केल्याने ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. गटनेते विजय इंगळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. शिंदे गटात गेलेले नगरसेवक सागर भारुका, मनोज पाटील, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे यांनी मूळ पक्ष सोडून बेकायदेशीरपणे दुसऱ्या गटात विलीनीकरण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

या 4 ही नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर असून प्रशासनाने यात तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : ST Bus: खासगी ट्रॅव्हल्स विसरा! एसटीची 'राजमाता जिजाऊ' सेवा सुरु; CCTV ते पॅनिक बटण, प्रवाशांसाठी काय आहे खास? )

अकोल्याचे राजकीय वातावरण तापले

शिंदे गटाने ठाकरे गटाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते आणि आमच्याकडे आवश्यक संख्याबळ असल्यानेच आम्ही नवीन नेतृत्वाची निवड केली आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, हा कायद्याचा आणि पक्षशिस्तीचा भंग असल्याचे ठाकरे गट सांगत आहे. 

या कलगीतुऱ्यामुळे अकोला महापालिकेत सध्या प्रचंड तणावाचे आणि उत्सुकतेचे वातावरण आहे. आता विभागीय आयुक्त या तक्रारीवर काय निर्णय घेतात आणि हे 4 नगरसेवक खरोखरच अपात्र ठरतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com