Akola News: अकोल्यात दुसऱ्याच्याच नावाने बनवले बनावट आधारकार्ड; शेती खरेदीचे मोठे रॅकेट उघडकीस, वाचा सविस्तर

Akola News: अकोला जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारात बनावट आधारकार्डचा वापर करून मोठा गैरप्रकार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News : या प्रकरणाची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने संशयितांवर पाळत ठेवली होती.
अकोला:

योगेश शिरसाट,प्रतिनिधी

Akola News: अकोला जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारात बनावट आधारकार्डचा वापर करून मोठा गैरप्रकार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) धाड टाकून काही संशयितांना ताब्यात घेतले असून, यामागे एक मोठे संघटित रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली शासकीय यंत्रणेला फसवण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने जिल्ह्यात त्याची चर्चा सुरु झाली आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात  मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद देठे यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या जागी दुसऱ्या एका व्यक्तीला उभे करण्यात आले होते. या संबंधित व्यक्तीच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले आणि त्याच्या आधारे शेती खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. 

Advertisement

तपासादरम्यान संबंधित व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आधार नोंदींशी तांत्रिकदृष्ट्या जुळत नसल्याचे, वयामध्ये मोठी तफावत असल्याचे आणि कागदपत्रांवरील सह्यांमध्येही विसंगती असल्याचे आढळले आहे. या सर्व त्रुटी असूनही हा व्यवहार नोंदणीच्या प्रक्रियेपर्यंत कसा पोहोचला, यावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

( नक्की वाचा : Akola News: भूखंडाच्या फाईलसाठी मागितली लाच अन् थेट ACB नं आवळल्या मुसक्या; अकोल्यातील बड्या अधिकाऱ्याला अटक )

कशी झाली कारवाई?

या प्रकरणाची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने संशयितांवर पाळत ठेवली होती. आज सकाळी सुमारे 11 च्या सुमारास शहरातील मधुर कोल्ड्रिंक्स रेस्टॉरंटमध्ये हे संशयित व्यवहाराची अंतिम पूर्तता करण्यासाठी एकत्र जमले होते. ही संधी साधत आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून धाड टाकली. अधिकारी अनिल जुमडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पैशांच्या व्यवहारादरम्यानच संशयितांना ताब्यात घेतल्यामुळे या कटाचे धागेदोरे उघड होण्यास मोठी मदत झाली आहे.

या प्रकरणात गोपाल अग्रवाल, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी तसेच शिवकुमार ठाकूर (ज्याने अरविंद देठे म्हणून भूमिका वठवल्याचा आरोप आहे) यांसारख्या अनेकांची नावे संशयित म्हणून समोर आली आहेत. याव्यतिरिक्त जमीन व्यवहारातील खरेदीदार मोहम्मद नदीम आणि वसीम अक्रम, तसेच साक्षीदार प्रफुल्ल हरिदास फाडके आणि उमाळे यांचीही भूमिका पोलिसांकडून तपासली जात आहे.

( नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: सियाचे आई-वडील पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, केतनबाबत झाले हळवे तर लेकीबद्दल म्हणाले... )

हे कृत्य केवळ काही लोकांपुरते मर्यादित नसून, यामागे कागदपत्रे तयार करणारे आणि यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेणारी एक टोळी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून आता मोबाईल संपर्क, बँक व्यवहार आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या अन्य लोकांची सखोल चौकशी सुरू असून, येणाऱ्या काळात आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता आहे

Advertisement
Topics mentioned in this article