आंबेगावमध्ये 'पाण्या'वरुन राजकारण तापलं; डिंभे धरण का ठरतोय कळीचा मुद्दा? वाचा संपूर्ण इतिहास

राज्यात विधानसभा निवडणुकांदरम्यान अनेक प्रचाराचे मुद्दे हे समोर येताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पाण्याच्या मुद्दा चांगलाच तापला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins

 अविनाश पवार, आंबेगाव: राज्यात विधानसभा निवडणुकांदरम्यान अनेक प्रचाराचे मुद्दे हे समोर येताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पाण्याच्या मुद्दा चांगलाच तापला आहे. या तालुक्यातील डिंभे धरण हे 1990  पूर्णत्वास आले. त्यापूर्वी आंबेगाव, शिरूर ची जनता तहानलेलीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मंचर सारख्या बाजारपेठेत आठवडे बाजाराच्या दिवशी अगदी त्यावेळेनुसार चारा आणि ग्लासने पाणी विकले जायचे, हे जुन्या पिढीतील अनेकांनी अनुभवले आहे. या मतदार संघात किसनराव बाणखेले यांचे प्रभुत्व होते. त्यावेळी सध्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्याकडे खाजगी स्विय सहाय्यक म्हणून काम पाहत होते.

शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार करण्याचा निर्धार केला आणि त्या पद्धतीने त्यांनी व्यूहरचना करून 1990 साली दिलीप वळसे पाटील यांना या विधानसभा मतदारसंघाचे आमदार केले. इथून पुढे दिलीप वळसे पाटील यांनी पाठीमागे वळून पाहिलेच नाही. जो धरणाचा मुद्दा आता प्रचारात आला आहे ह्या धरणाची मूहूर्तमेढ 1976 मध्ये रोहयो मधून झाली. प्रत्यक्ष बांधकामास 1978 साली सुरुवात झाली आणि हे धरण 1992 मध्ये या धरणात केवळ 1.70 टीएमसी इतका पाणीसाठा झाला. 

Advertisement

नक्की वाचा: 'काहीही झालं तरी फडणवीसांकडे सत्ता नाही', रोहित पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले

सन 2001 पासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात  झाली. या धरणाच्या डाव्या कालव्यावर 2631 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते तर उजव्या कालव्यावर 14550 हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येते. या धरणाच्या सांडव्यावरून 3 ते 4 टीएमसी पाणी हे पूर्ण क्षमतेने भरल्यावर वाहून जाते हे पाणी शेजारच्या जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात वळवावे अशी मागणी होत होती. मात्र हे धरण पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरतेच असे नाही हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर हे पाणी माणिकडोह धरणात वळविण्याची योजना होती. त्याऐवजी आता थेट धरणाच्या तळाशी बोगदा करून ते पाणी हे जुन्नर तालुक्यातील माणिकडोह मधून कर्जत जामखेडला नेण्याची तयारी सुरू आहे.  यामुळे आंबेगाव शिरूर मधील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवेल अशी भीती निर्माण होते आहे. 

Advertisement

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी डिंभे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या संदर्भात जलसंचनाच्या दृष्टिकोनातून अनेक कामे शासनाकडून मंजूर केली. परिणामी आंबेगाव शिरूरसह जुन्नर तालुक्यातील काही गावांचा जलसिंचनाचा प्रश्न सुटला इथला शेतकरी हा सधन बनला. आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा प्रभावीपणे काम करू लागला. मात्र या डिंभे धरणाच्या तळात बोगदा करून त्याचे पाणी हे जुन्नर तालुक्यातील माणिक डोह धरणामध्ये टाकून हे पाणी कर्जत जामखेड या भागातील शेतीला पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी या प्रचारा दरम्यान सांगितले आहे. खरंतर डिंभे धरणाच्या पाण्याचे विभाजन हे यापूर्वीच डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे कोणत्या विभागाला किती पाणी पुरवायचे याचे नियोजन झाले आहे. विशेषतः डाव्या कालव्याला अनेक ठिकाणी अस्तरीकरण न झाल्याने पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत्या त्या दृष्टिकोनातून शासनाने या अस्तरणीकरणाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून दिला आहे.

Advertisement

महत्वाची बातमी: 'बटेंगे तो कटेंगे'वरुन महायुतीत फूट?; अजित पवार-देवेंद्र फडणवीस आमने-सामने

 आता या दृष्टीने  निधी उपलब्ध आल्यानंतर देखील बोगद्याचा आग्रह हा धरला जात असल्याचे समोर येताना दिसत आहे आणि हाच प्रचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आंबेगाव शिरूरमधील जनतेसमोर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांनी डिंभे धरणाच्या पाण्याच्या थेंबालाही धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तिकडे आमदार निलेश लंके यांनी आपल्यात आता डिंभे धरणाच्या पाण्याला विरोध करणाराच राहिला नाही त्यामुळे आपण आता हे पाणी कर्जत जामखेड करता आणणारच अशी भूमिका घेतली आहे. रोहित पवार हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून कर्जत जामखेड मधील जनतेला आपण डिंभे धरणाचे पाणी हे आपल्या तालुक्यात आणणारच असे सांगतात. अशा या सगळ्या आरोप प्रत्यारोपा दरम्यान डिंभे धरणाच्या पाण्याचं काय होणार? असा प्रश्न जनतेला नक्कीच पडला असेल.

 यापूर्वी झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी डिंभे धरणाच्या बोगद्याच्या संदर्भात 14 मीटरवर हा बोगदा घेण्यास परवानगी दिल्याचे देखील समोर येताना दिसत आहे. मग आता ऐन वेळेस ही भूमिका का घेतली यावर ते बोगदा हा एक मीटर वर घेतला जात असल्याने माझा विरोध आहे असे सांगतात. दुसरीकडे पाटील यांना ईडीची भीती होती त्यामुळे ते भाजपमध्ये गेले असा देखील आरोप होताना दिसत आहे... अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर दरम्यान आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचे पाणी हे आपल्याला खऱ्या अर्थाने पेटलेले दिसत आहे. त्यामुळे डिंभे धरणाच्या पाण्याचा प्रश्न हा इथल्या निवडणुकीमध्ये मुख्य मुद्दा बनला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही...