Amit Shah Raigad visit : केंद्रीय मंत्री अमित शाह काल 11 एप्रिलला पुण्यात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं. आज ते रायगडावर शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यामुळे रायगडचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अद्यापही रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवार गटासह शिंदे गटाचे नेतेही आग्रही आहेत. शिवसेना भरत गोगावलेंसाठी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे, तर अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांनाही रायगडचं पालकमंत्रिपद हवं आहे. त्यामुळे या जागेवर नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच लक्ष आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र शिंदे गटाच्या नाराजीनाट्यानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर रायगडाच्या पालकमंत्रिपदी कोणाचीच नियुक्ती करण्यात आलेली नाही.
नक्की वाचा - Konkan News: 'उद्धव ठाकरे कोकणात येतील तेव्हा कोंबडी-वडे, माशांची हॉटेल बंद ठेवा' कुणी दिले आदेश?
दरम्यान आज केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडावर दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या घरी जेवणालाही जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीतून अमित शाह रायगडाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.