जाहिरात

Amravati News: 'त्या' उड्डाणपुलाचं लोकार्पण रखडलं,अमरावतीकर वाहतूक कोंडीच्या विळख्यात, प्रवाशांचा जीव टांगणीला

बडनेरा शहरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला,नव्याने बांधकाम पूर्ण झालेला रेल्वे उड्डाणपूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला न झाल्यामुळे बडनेरेकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

Amravati News: 'त्या' उड्डाणपुलाचं लोकार्पण रखडलं,अमरावतीकर वाहतूक कोंडीच्या विळख्यात, प्रवाशांचा जीव टांगणीला
Amravati Badnera Railway Flyover News

शुभम बायस्कर, प्रतिनिधी

Badnera Railway Flyover Traffic Issue : बडनेरा शहरातील नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला,नव्याने बांधकाम पूर्ण झालेला रेल्वे उड्डाणपूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला न झाल्यामुळे बडनेरेकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असतानाही केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे  या पुलाचे अधिकृत लोकार्पण रखडले असल्याचा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

बडनेरा शहरातील हा नवीन रेल्वे उड्डाणपूल अमरावतीमधील दस्तुरनगर,औद्योगिक क्षेत्र (MIDC),प्रसिद्ध कोंडेश्वर मंदिर, राष्ट्रीय महामार्ग आणि बडनेरा जुनी वस्ती या अत्यंत महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा मुख्य दुवा आहे. या उड्डाणपुलाच्या खालून रेल्वेची मुख्य लाईन जाते. त्यामुळे येथील रेल्वे गेट वारंवार बंद करावे लागतात. रेल्वे गेट बंद झाल्यामुळे या मार्गावर तासनतास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि भीषण वाहतूक कोंडी निर्माण होते.अनेकदा रुग्णवाहिकांना इथे थांबवं लागलं.स्थानिक प्रवाशांमध्ये यावरून मोठा वादही झाला होता.हीच कोंडी फोडण्यासाठी लाखो रुपये खर्चून येथे भव्य पूल उभारण्यात आला.मात्र,काम पूर्ण होऊनही पूल सुरू न केल्याने प्रशासकीय अनास्थेचा कळस गाठला गेला आहे.

रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांनाही बसतो ट्रॅफिकचा फटका

हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जवळ असल्याने या अरुंद पर्यायी रस्त्यावरून केवळ दुचाकीच नव्हे,तर अवजड चारचाकी वाहने आणि मालवाहू ट्रकचीही अहोरात्र वाहतूक सुरू असते.पर्यायी मार्ग अत्यंत खराब आणि अरुंद असल्याने येथे रोज लहान-मोठे अपघात होत असून नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे,जवळच मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र असलेले 'बडनेरा रेल्वे स्टेशन'आहे. मुंबई,पुणे,नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी दररोज हजारो प्रवासी याच मार्गाचा वापर करतात.रेल्वे पकडण्याच्या घाईत असणारे प्रवासी, रुग्णवाहिका आणि विद्यार्थी रोज या ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडत आहेत. लोकप्रतिनिधींना निवडणुकीपुरते राजकारण करायला वेळ आहे.

नक्की वाचा >>Sangli News: भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात, पाच जण जखमी, दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत

पण जनतेच्या या रोजच्या त्रासाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही,अशी संतप्त भावना आता जनमानसात उमटत आहे.पुलाचे काम डोळ्यांसमोर पूर्ण झाले आहे.मग तरीही तो वाहतुकीसाठी का सुरू केला जात नाहीये?कोणत्या व्ही.आय.पी.नेत्याच्या तारखेची प्रशासन वाट पाहतंय?नेत्यांच्या सोयीसाठी सामान्य जनतेला रोज तासनतास ट्रॅफिकमध्ये का अडकवले जात आहे?लोकप्रतिनिधींनी तात्काळ हा पूल जनतेसाठी खुला करावा,अशी मागणी केली जात आहे. 

"अपघातांची शक्यता प्रचंड वाढली"

बडनेरा स्टेशनवरून मला रोज नागपूरसाठी ट्रेन पकडावी लागते.या बंद रेल्वे गेट आणि रखडलेल्या पुलामुळे माझी अनेकदा ट्रेन चुकली आहे.इथे पर्यायी रस्त्यावर इतकी वाहतूक कोंडी होते की रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळत नाही.लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिली जात आहे. हा पूल दस्तुरनगर आणि एमआयडीसी क्षेत्राला जोडणारा मुख्य मार्ग आहे.अवजड गाड्या याच अरुंद मार्गावरून जातात,ज्यामुळे अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे.लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनं देतात,प्रत्यक्ष जमिनीवर नागरिकांचे हाल होत आहेत.हा पूल लवकरात लवकर सुरू झाला नाही तर व्यापारी आणि नागरिक आक्रमक होतील,अशी प्रतिक्रिया शिरीष घोडके यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> Kolhapur News: शिवसेना UBT नेत्याने उडवली खळबळ ! शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

"हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला झाला,तर या भागातील सर्व समस्या कायमच्या सुटतील आणि आम्हा स्थानिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.रोजची डोकेदुखी झालेली ही वाहतूक कोंडी एकदाची फुटेल,ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सोयीचा होईल.बडनेरा स्टेशनवरून मुंबई-पुण्यासाठी गाड्या पकडणाऱ्या प्रवाशांना विहित वेळेत ट्रेन गाठता येईल आणि या संपूर्ण परिसरातील वाहतूक गतिमान होईल.आता तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उद्घाटनाचा मुहूर्त काढावा.",अशी प्रतिक्रिया बडनेरा येथील नागरिक अरुण नारायण माहोरे यांनी दिली आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com