Amravati News: हनुमान मंदिराच्या भिंतीवरून वाद! काँग्रेस खासदाराचं पत्र अन् भाजपचा पलटवार; काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील वडनेर गंगाई येथील प्राचीन हनुमान मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती 

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील हनुमान मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी या बांधकामावर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे पत्र म्हणजे केवळ अडवणूक असून त्यातील माहिती धादांत खोटी असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

वडनेर गंगाई येथील प्राचीन हनुमान मंदिराच्या सुरक्षेसाठी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या निधीतून संरक्षक भिंतीच्या (वॉल कंपाऊंड) कामाला मंजुरी दिली होती. या कामासाठी ग्रामपंचायतीने रीतसर ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिलेले असतानाही, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हे काम थांबवण्याची मागणी केली. या पत्रात त्यांनी सार्वजनिक अडथळ्याचे कारण दिले आहे.

Advertisement

1200 विद्यार्थ्यांच्या दाव्यावरून भाजपचा पलटवार

खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मंदिराशेजारी अंगणवाडी असून तिथे 1000 ते 1200 मुले शिकतात. या दाव्याची भाजपने जोरदार खिल्ली उडवली असून खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे."महाराष्ट्रातील एकाही अंगणवाडीत 1200 मुले असणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. केवळ हिंदू मंदिराचे काम रोखण्यासाठी खासदारांनी आकड्यांचा हा खेळ मांडला आहे. हे पत्र म्हणजे हिंदूविरोधी मानसिकतेचे लक्षण आहे," अशी टीका भाजपचे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी केली आहे. 

(नक्की वाचा-  Gold Rate Today: सोन्याच्या दरात 2100 रुपयांची घसरण, चांदीही स्वस्त; चेक करा नवे दर)

जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासदारांनी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी खोट्या माहितीचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी आणि मंदिराचे थांबलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)

वाद अधिक चिघळण्याची चिन्हे

हनुमान मंदिराच्या भिंतीवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ प्रशासकीय राहिलेला नाही. प्रभू श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवूनच आता हनुमान मंदिराला विरोध केला जात असल्याची आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या वादामुळे परिसरात धार्मिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता असून, हिंदू भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत हे काम पुन्हा सुरू न झाल्यास भाजपने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे, विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात याच मंदिर परिसरात दोन गट आमने सामने आल्याने दगडफेकीची घटना देखील उद्भवली होती. तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे हा वाद निवळला होता. मात्र पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Topics mentioned in this article