शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amaravati News : अमरावतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला असून यात ते जखमी झाले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असताना ही घटना घडली. सध्या त्यांच्यावर अमरावतीमधील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली असली, तरी खुद्द आमदार खोडके यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना धीर दिला आहे.
कसा झाला अपघात?
अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. आमदार संजय खोडके हे शनिवारी (20 डिसेंबर) दुपारी अशाच एका बैठकीसाठी निघाले होते.
नवसारी परिसरातील एक बैठक संपवून ते आपल्या दुचाकीने दुसऱ्या बैठकीच्या ठिकाणाकडे जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे संजय खोडके रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या पायाला तसेच मणक्याला दुखापत झाली.
( नक्की वाचा : Exit Poll 2025 : महायुती की मविआ? नगरपालिकांच्या रणधुमाळीत कुणाचं पारडं जड? वाचा प्रत्येक विभागाचा एक्झिट पोल )
नेहमीप्रमाणे दुचाकीचा प्रवास ठरला अंगाशी
संजय खोडके हे अमरावती शहरात नेहमीच दुचाकीने प्रवास करणे पसंत करतात. चारचाकी वाहनापेक्षा दुचाकीवरून प्रवास केल्यास सर्वसामान्यांशी आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधणे सोपे जाते, असा त्यांचा अनुभव आहे.
मात्र, याच साधेपणातून प्रवास करत असताना त्यांच्यावर अपघाताची वेळ आली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिल्यानंतर परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत त्यांना राजापेठ येथील रिम्स रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
इथे पाहा अपघाताचा Video
खोडके यांनी काय सांगितलं?
अपघाताची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आमदार संजय खोडके यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली तब्येत ठीक असल्याची माहिती दिली आहे.
आज दुपारी 3 वाजता माझ्या दुचाकीला अपघात झाला, सध्या डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून रिपोर्ट सामान्य आहेत, असे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना 1 दिवस रुग्णालयात विश्रांती घ्यावी लागणार आहे. उद्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला मी उपस्थित राहणार असून कुणीही काळजी करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world