शुभम बायस्कार, अमरावती
Amravati Crime News : अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे-तायडे यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आशा यांच्या पतीनेच सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधांतून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, हत्या करणाऱ्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वी अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा धुळे (तायडे) यांची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हा चोरीचा प्रकार असल्याचा बनाव पतीने रचला होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासामुळे हत्येचा खरा कट उघडकीस आला.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: मोबाईल न मिळाल्याने 16 वर्षीय मुलाचा टोकाचा निर्णय, डोंगरावरून उडी घेत आयुष्य संपवलं)
प्रेमसंबंध आणि वादातून हत्येचा कट
हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आरोपी पती राहुल तायडे यानेच रचल्याचे समोर आले आहे. राहुलचे एका दुसऱ्या महिलेशी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. याआधीही पत्नी आशा यांनी पोलिसात याबाबत तक्रार केली होती. याच प्रेमप्रकरणातून राहुलने पत्नीच्या हत्येचा कट रचला. एक महिन्यापूर्वीच त्याने दोन मित्रांना पत्नीच्या हत्येची 5 लाखांची सुपारी दिली होती.
हत्येच्या दिवशी आरोपी पतीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, मारेकऱ्यांनी 25,000 ॲडव्हान्स घेतला आणि ते फरार झाले. पोलिसांनी आरोपी पती राहुल तायडे याला अटक केली आहे. फरार आरोपींचा देखील शोध पोलीस घेत आहेत.
(नक्की वाचा - Jalne News: भाजप आमदाराचा कार्यकर्ता निघाला चोर, त्याने कसली चोरी केली माहित आहे का?)
आशा आणि राहुल यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर राहुलच्या प्रेमसंबंधांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना लवकरच अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.