'मेहबुबा' प्रचारात उतरणार का? लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दानवे-खोतकरांची भेट

Jalna Politics : आज जालन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर दानवेंनी प्रचारात सहभागी व्हावं अशी विनंती खोतकरांनी दानवेंना केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

जालन्यातील शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी आज भोकरदन येथे जाऊन भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यामुळे जिल्ह्यात "तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून मला करमेना"अशा चर्चांना उधाण आलं आहे. तर काही ठिकाणी खोतकर यांची मेहबुबा प्रचारात उतरणार का? अशा चर्चांही सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी मदत न केल्याने आपला प्रभाव झाल्याचा आरोप अनेक कार्यक्रमातून रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातला दुरावाही वाढला होता. त्यातच जालना विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडाचा झेंडा हाती घेतला होता.

(नक्की वाचा: जनतेचे पैसे घरी घेऊन जायचे नसतात! श्रीकांत शिंदेंची मविआ नेत्यांवर सडकून टीका)

त्याच दरम्यान अर्जुन खोतकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रावसाहेब दानवे यांच्या मध्यस्थीनंतर भास्कर दानवे यांचं बंड थंड करण्यात महायुतीला यश आलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा दोघांची ही भेट झाली आहे. दानवे आणि खोतकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संवाद होत नव्हता. त्यामुळे या भेटीला विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्व आलं आहे.

आज जालन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर दानवेंनी प्रचारात सहभागी व्हावं अशी विनंती खोतकरांनी दानवेंना केली. त्याचबरोबर आमच्यातील कटुता आम्ही दोघांनी बसून मिटवली आहे, अशी दानवे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

Advertisement

(नक्की वाचा- : "भाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार"; महादेव जानकरांचा हल्लाबोल)
 
गेल्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटत पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी, अन्यथा आपण बंडखोरी करत अर्जुन अस्त्राने  दानवेचा वध करणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर अमित शाह यांच्या जाहीर सभेत रावसाहेब दानवे ही माझी मेहबुबा आहे, असं खोतकर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे खोतकरांची रुसलेली मेहबुबा आज  खोतकरांच्या प्रचारासाठी मैदानात उतरेल का? शिंदेच्या जाहीर सभेत येऊन प्रचार करते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Topics mentioned in this article