निनाद करमरकर
जनतेचे पैसे घरी न्यायचे नसतात ते जनतेला परत करायचे असतात, म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. पूर्वीच्या सरकारमध्ये तितकीही दानत नव्हती. मात्र आता काँग्रेसला पराभव समोर दिसू लागताच त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना 3 हजार रुपये देऊ अशी घोषणा केल्याची टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारासाठी आलेले असताना एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करताना त्यांनी ही टीका केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोरोना काळात जनतेला खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती. मात्र त्यावेळेस अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून फक्त अडीच कोटी रुपये वाटण्यात आले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात साडेतीनशे कोटी रुपये दिले, असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लक्ष्य केलं. तसंच ज्या काँग्रेसने आधी लाडकी बहीण योजना बंद करा, अशी मागणी केली होती, त्याच काँग्रेसने त्यांच्या जाहीरमान्यात आमचं सरकार आल्यावर महिलांना 3 हजार रुपये देऊ, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे पराभव समोर दिसू लागल्यामुळेच काँग्रेस आता बावचळली आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. तर एक मुलगा म्हणून आपले वडील पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटणं सहाजिक आहे. मात्र महायुतीत कुणीही मला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, असं म्हणत नाही. आम्ही सगळेच महायुतीचं काम करत असून पुढील काळात महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताने येणार आहे. त्यावेळेस यापेक्षाही चांगलं काम करायचं असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.
नक्की वाचा :'राज'पुत्राविरोधात नरेंद्र मोदी मैदानात, शिवतीर्थावरील सभेत पंतप्रधान काय बोलणार?
'लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत!
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जर काँग्रेसच्या सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, आम्हाला पाठवा, त्यांचा बंदोबस्त करु... असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. धनंजय महाडिक यांच्या या विधानावरुन आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला होता. लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणाच्या बापाचे नाहीत, असं ते म्हणालेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. गोंदियामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
(नक्की वाचा: वडिलांना मुख्यमंत्री बनवण्याचा मुलीने बांधला चंग, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन)
भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी हे काँग्रेसच्या सभेमध्ये दिसत असतील तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या करेक्ट कार्यक्रम करू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. "हा पैसा का त्यांच्या बापाचा आहे. सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतात त्यांचा हा पैसा आहे. त्यांच्या बापाचा हा पैसा नाही आणि लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती. आम्ही दुधाला भाव मागितला होता. आम्ही धान्य पिकाला भाव मागितला होता, पण ते सरकारला जमलं नाही आणि मतासाठी लाडकी बहीण योजना सुरू करता. ही लाडकी बहीण तुम्हाला आता धडा दिल्याशिवाय राहणार नाही", अशी टीका त्यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राज्य सरकारवर केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world