जाहिरात

Ashadhi Wari : आषाढी वारीत पहिल्यांदाच असं घडणार; वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मंत्र्यांचा मोठा निर्णय

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रथमच मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Ashadhi Wari : आषाढी वारीत पहिल्यांदाच असं घडणार; वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मंत्र्यांचा मोठा निर्णय

Ashadhi Wari : यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासोबतच सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स, आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून लाखो वारकरी भाविकांना तातडीची उपचार सेवा देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. 

अत्यावश्यक रुग्णांना कमी वेळेत उच्चस्तरीय उपचार...

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे अत्यावश्यक रुग्णांना कमी वेळेत उच्चस्तरीय उपचार मिळावेत यासाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. गंभीर रुग्णांना तातडीने विशेष रुग्णालयात हलविण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय, गर्दीच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स, आधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सतत कार्यरत राहणार आहेत.

'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची' आणि 'आरोग्यसंपन्न वारी' या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून वारकरी भाविकांना पालखी मार्गावरच आरोग्यविषयक माहिती, मार्गदर्शन आणि तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकेमार्फत आवश्यक आरोग्य संदेश, आजार प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचार सेवा भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

वारकरी घरातून वारीसाठी प्रस्थान केल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत त्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याचे व्यापक नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर आरोग्य सेवा उपलब्ध राहतील, यासाठी संबंधित जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही यावेळी आरोग्य मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

यंदाची आषाढी वारी केवळ भक्तीचा नव्हे, तर अत्याधुनिक आरोग्य व्यवस्थापनाचा आदर्श ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

बैठकीच्या प्रारंभी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी वारीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या व्यापक नियोजनाची माहिती सादर केली. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था तसेच मनुष्यबळाची उपलब्धता याबाबतची माहिती दिली. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर तसेच पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील प्रशासन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com