Ashok Kharat Rape Case: नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्कार प्रकरणी अटक केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अशोक खरात हा हायप्रोफाईल लोकांचे भविष्य सांगायचा. राजकीय नेत्यांसह प्रशासकीय क्षेत्रातील बड्या अधिकारीही त्याच्या भामटेगिरीला भुलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होत असून खरातची हादरवणारी काळी कुंडली समोर आली आहे. अशातच आता कॅप्टन खरातकडेच तब्बल 3 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
कॅप्टन खरातकडे मागितलेली 3 कोटींची खंडणी
सध्या बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली अब्रु लुटणाऱ्या अशोक खरातकडेच काही दिवसांपूर्वी तीन कोटींची खंडणी मागण्यात आली असल्याचे समोर आले आहे. तुमचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत, असे सांगून कॅप्टन खरातला धमकावण्यात आले होते. याप्रकरणी सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 मध्ये दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Ashok Kharat: शिर्डी, सिन्नर, कोपरगाव... वासनांध अशोक खरातकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, कुठे किती घबाड?
शासकीय यंत्रणा अशोक खरातची नोकर....?
अशोक खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थानचे सिन्नर तालुक्यातील ईशान्येश्वर मंदिर पूर्णपणे जाम नदी पात्रात उभारण्यात आले आहे. मंदिराला पुराच्या पाण्याचा फटका बसू नये म्हणून ईथे बंधारा बांधण्यात आला आहे. या मंदिरासाठी विशेष आवर्तन सुद्धा मंजूर करण्यात आली असल्याची चर्चा असून मंदिराला उन्हाळ्यातही पाणी मुबलक असते. एकीकडे मार्च महिन्यात सिन्नरच्या अनेक भागात पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवावे लागत असताना मंदिरात मात्र पाण्याचे कारंजे सुरू आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणा पूर्णपणे खरातसाठी राबत होती का ? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
रुपाली चाकणकरांविरोधात रोष
दरम्यान, याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. रुपाली चाकणकर या स्वतः अशोक खरातला गुरु मानत होत्या तसेच तो अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थानच्या त्या सदस्यही होत्या. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Ashok Kharat: अशोक खरात प्रकरण; रूपाली चाकणकरांच्या व्हायरल व्हिडीओ खळबळ, राजकारण पेटलं
रुपाली ठोंबरेंपाठोपाठ सुषमा अंधारेही चाकणकरांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. अशोक खरात प्रकरणातील आणखी काही पुरावे सुषमा अंधारे समोर आणणार आहेत. अशोक खरात प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्र सुषमा अंधारे यांच्या हाताला लागल्याची माहिती समोर आली असून उद्या पत्रकार परिषद घेऊन त्या याबाबत स्फोटक खुलासा करणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world