शर्यतीचा प्रचंड नाद, याच नादातून बैल घेतला, त्याला जिवापाड जपलं, मात्र याच बैलाने घात केला. धक्कादायक बाब म्हणजे मालकाच्या मृत्यूनंतर बैलानेही प्राण सोडला. विजय म्हात्रे असं मालकाचं नाव असून म्हात्रे एका खासगी शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर...
सरावासाठी नेताना बैलाने केलेल्या हल्ल्यात बैलाच्या मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार बदलापुरात घडला आहे. विजय म्हात्रे असं मालकाचं नाव असून म्हात्रे एका खासगी शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड असल्यानं ते बैल सांभाळत होते. मंगळवारी नियमितपणे म्हात्रे यांनी आपल्या बैलाला सरावासाठी बाहेर काढलं आणि ते त्याला उल्हास नदीकिनारी घेऊन निघाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी बैलाच्या दोरीत त्यांचा पाय अडकला. त्यामुळे म्हात्रे खाली पडले. यावेळी बैलाला झटका बसल्यानं संतापलेल्या बैलाने त्यांच्यावर हल्ला चढवला. म्हात्रे हे खाली पडलेले असल्यानं ते प्रतिकार किंवा स्वतःचा बचाव करू शकले नाहीत. यावेळी आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले, पण बैलाचं उग्र रूप पाहून कुणाचीही जवळ जायची हिंमत झाली नाही, आणि अखेर विजय म्हात्रे यांचा मृत्यू झाला.
दुसरी दुर्दैवी गोष्ट म्हणजे विजय यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बैलाचाही मृत्यू झाला. विजय यांचा पाय ज्यावेळी दोरीत अडकला, त्यावेळी बैलाला झटका बसून अंतर्गत दुखापत झाली का? म्हणून बैल चवताळला का? आणि त्या दुखापतीमुळे नंतर त्याचाही मृत्यू झाला का? असे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित झाले आहेत.
(नक्की वाचा- BJP vs Congress : संसद परिसरातील अभूतपूर्व गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय)
याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय म्हात्रे हे अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात विद्यार्थ्यांना तायक्वांदो आणि स्केटिंग खेळाचं प्रशिक्षण देत होते. म्हणूनच विजय म्हात्रे सर अशी त्यांची ओळख होती. बदलापूर, अंबरनाथ मधील अनेक खेळाडूंनी त्यांच्यामुळे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. त्यांच्या आणि त्यांच्या बैलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world