जाहिरात

Parth Pawar: पार्थ पवारांना स्वकीयांनीच घेरलं; आई सुनेत्रा पवार नव्या चक्रव्युहातून मुलाला कसं बाहेर काढणार?

Parth Pawar Congress Criticism : पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळंच राजकारण सुरु झालंय.

Parth Pawar: पार्थ पवारांना स्वकीयांनीच घेरलं; आई सुनेत्रा पवार नव्या चक्रव्युहातून मुलाला कसं बाहेर काढणार?
Parth Pawar Congress Criticism : खासदार पार्थ पवार त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत.
मुंबई:


Parth Pawar Congress Criticism : पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळंच राजकारण सुरु झालंय. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही निवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय. पण, त्याचवेळी उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे पवार कुटुंबीयांनीच त्यांना टार्गेट केल्यानं नवी चर्चा सुरु झाली आहे.

नेमकं काय घडलं?

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला आहे. अजित पवारांचे  योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती, मात्र काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार उभा केला. याच गोष्टीचा राग मनात धरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल म्हणजेच पडझड सुरू झाली आहे, असे वक्तव्य पार्थ यांनी केले.

पार्थ पवारांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. ज्या काँग्रेसवर पार्थ यांनी टीका केली, त्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली. धड भाषणही करता न येणाऱ्या आणि केवळ पूर्वपुण्याईवर राजकारणात आलेल्या मुलाने काँग्रेसबद्दल बोलू नये, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ यांना सुनावलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही, कोणाचा डाऊनफॉल होणार हे वेळच ठरवेल, असा टोला लगावला.

( नक्की वाचा : Pune News :हिंजवडी आयटी पार्कला जाणारा रस्ता आता सुसाट; पुणे महापालिकेची मोठी कारवाई,वाचा काय घडलं? )

पवार कुटुंबीयांकडूनही टार्गेट

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पार्थ पवारांच्या या विधानाचे समर्थन त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील ज्येष्ठ नेत्यांनीही केलेले नाही. पार्थ यांचे आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या विषयावर विचारले असता, केवळ स्मितहास्य करत सूचक वक्तव्य केले. राजकारणात महत्त्वाच्या विषयांवर बोलण्यासाठी जी परिपक्वता लागते, ती कितपत आहे हे आज सांगू शकत नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पार्थ यांना अपरिपक्व ठरवले आहे. यापूर्वी सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही शरद पवारांनी पार्थ यांच्या मताला कवडीची किंमत नसल्याचे म्हटले होते.

केवळ शरद पवारच नाहीत, तर कुटुंबातील इतर सदस्यांनीही पार्थ यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी पार्थ यांची प्रतिक्रिया योग्य नसल्याचे म्हटले, तर आत्या सुप्रिया सुळे यांनी आपण काँग्रेसच्याच तालमीत तयार झालो असून आज जो मोकळा श्वास घेत आहोत तो काँग्रेसमुळेच असल्याचे सांगत पार्थ यांना टार्गेट केलंय. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र पार्थ यांचा हा केवळ एक त्रागा असल्याचे सांगून त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

( नक्की वाचा : Sunetra Pawar: 'दादांकडे जाऊ दिलं नाही, आता वहिनींकडे तरी..' राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील 'ती' Audio Clip Viral )
 

सुनेत्रा पवार काय करणार?

आता या वादात सुनेत्रा पवार यांची कोंडी झाली आहे. एका बाजूला मुलाने आईच्या प्रेमापोटी आणि निवडणुकीच्या तणावातून केलेले विधान आहे, तर दुसऱ्या बाजूला  पवार कुटुंब आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष पार्थ यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. पोटनिवडणुकीच्या या रणधुमाळीत आपल्या मुलाला या टीकेतून बाहेर काढणे आणि मतदारांपुढे आपली बाजू मांडले, हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com