आकाश सावंत, बीड
Beed Rains News : बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, 36 गावांचा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 51 जणांना हेलिकॉप्टर आणि लष्कराच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पावसाच्या वाढत्या धोक्यामुळे आणि पूरस्थितीमुळे बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
(नक्की वाचा- Marathwada Rain: मराठवाड्यात का होत आहे ढगफुटी सदृष्य पाऊस? हवामान तज्ञ काय म्हणतात?)
मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू
जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. लष्कराच्या तुकड्यांनीही बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे 51 लोकांचे प्राण वाचवता आले. महिलांसह मुले व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून, सततच्या उड्डाणांद्वारे बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या भागांमध्ये मदतकार्य पोहोचवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांना योग्य ती मदत दिली जाईल.