जाहिरात

Beed News : बीडमध्ये एकाच रात्रीतून उभारलं स्मारक; गेवराईतील राजकारण पुन्हा तापलं, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीडच्या गेवराई शहरात रात्रीतून पुतळे उभारण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. रात्रीतून पुतळा उभारण्याचा बीड पॅटर्न नेमका काय आहे?

Beed News : बीडमध्ये एकाच रात्रीतून उभारलं स्मारक; गेवराईतील राजकारण पुन्हा तापलं, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : बीडच्या गेवराई शहरात रात्रीतून पुतळे उभारण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून उभारण्यात आला होता. त्यानंतर आता कोल्हेर रोड परिसरात संत सेवालाल महाराज यांचे स्मारक रात्रीतून उभारण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकृत परवानगी घेतलेली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हेर रोड परिसरात संत सेवालाल महाराज यांचे स्मारक रात्रीच्या वेळी उभारण्यात आले. या स्मारकासाठी संबंधित प्रशासन किंवा नगरपरिषदेची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेत संबंधित व्यक्तींविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली. नगरपरिषदेकडून पत्र देण्यात आल्यानंतर गेवराई पोलीस ठाण्यात स्मारक उभारणाऱ्या 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रीतून पुतळा उभारण्याचा बीड पॅटर्न नेमका काय आहे?

दरम्यान, गेवराई शहरात यापूर्वीही अशाच प्रकारे रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्यामुळे शहरात रात्रीतून पुतळे उभारण्याचा “बीड पॅटर्न” पुन्हा चर्चेत आला आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पुढील कारवाई सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे.

नक्की वाचा - Beed News : आदिनाथ महाराजांना कोण त्रास देत होतं? गुप्तांगांवर वार केल्याप्रकरणी शिष्याची धक्कादायक माहिती

बंजारा बांधवांकडून आनंदोत्सव

दुसरीकडे, या स्मारकाबाबत बंजारा समाज बांधवांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. तालुक्यातील बंजारा समाजाची संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे समाजातील काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत स्मारक उभारल्याचं सांगितलं जात आहे.

पुतळा संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब राठोड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “बंजारा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या स्मारकाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. तसेच या ठिकाणचा पुतळा कोणीही हलवू नये,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणामुळे गेवराई शहरात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रशासन पुढील काळात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com