प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
Beed News : बीड जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराजांसोबत घडलेल्या घटनेमुळे वारकरी समाजात खळबळ उडाली आहे. आदिनाथ महाराजांनी गुप्तांगावर वार करीत स्वत:ला जखमी केल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेदरम्यान महाराजांनी तारकेश्वर गडावर स्वत:च्या खोलीत जननेंद्रियांवर शस्त्राने वार केले. खोलीतच महाराज रक्तबंबाळ अवस्थेत होते. ही बाब लक्षात येताच सेवक आणि भक्तांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. मात्र महाराजांची स्वत:च्या गुप्तांगावर वार का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत त्यांच्या शिष्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.
बाबांना त्रास देणाऱ्याचा शोध घ्या...
वारंवार संत-महंतांना त्रास दिला जात आहे. बाबांनी असं करायला नको होतं. बाबांना त्रास देणारा जो कोणी नराधम असेल त्याचा शोध घ्यायला हवा. यापूर्वीही अनेक महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. धार्मिक आदरस्थान असलेल्या व्यक्तिमत्त्वांवर त्रास देणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून समाजाने त्याचा बंदोबस्त करायला हवा. आदिनाथ महाराजांच्या प्रकरणात काही संशयित आहेत. त्यांचे सीडीआर काढा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. आदिनाथ महाराज कधीच याबाबत बोलणार नाहीत, त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला पकडणं अत्यंत गरजेचं आहे, अशी माहिती बीडमधील रहिवासी आणि आदिनाथ महाराजांचे भक्त भाऊसाहेब लटपटे यांनी दिली आहे.
रुग्णालयातून आदिनाथ महाराजांचा व्हिडिओ...
आदिनाथ महाराजांनी असं पाऊल उचलल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक बीडला येत आहेत. दरम्यान आदिनाथ महाराजांची रुग्णालयातून एक व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये त्यांनी भक्तांना आवाहन केलं आहे. माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. कोणी काही काळजी करू नका. मी लवकरात लवकर गडावर येणार आहे असं सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world