ऊसतोड कामगारांचे प्रश्न अनेकदा विविध माध्यमातून मांडण्यात आले आहे. कधी पुस्तकं, लेख, वृत्तांमधून ऊसतोडणी कामगारांच्या व्यथा लोकांसमोर ठेवण्यात आल्या आहेत. एकदा उचल घेतल्यानंतर वर्षभर कुटुंबच्या कुटुंब ऊसतोडणीसाठी दिलेल्या गावीच आपला संसार थाटतात. दरम्यान ऊसतोड महिला कामगारांबद्दल धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परगावी राहत असल्यामुळे येथील महिलांना अनेक शारिरीक आणि मानसिक आजारांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी उपचार केलेही जातात. मात्र बीडमधील तब्बल 843 महिलांनी ऊसतोडणीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जास्त चिंतेची बाब म्हणजे यामध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा आकडा सर्वाधिक आहे. त्याशिवाय 1523 महिला गर्भवती असतानाही ऊसाच्या फडात काम करीत असल्याचंही समोर आलं आहे. ऊसतोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर आरोग्य विभागाकडून महिला आणि पुरुषांची तपासणी केली जाते. त्यादरम्यान ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यस्तरावरुन ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेण्यात आली होती.
नक्की वाचा - Beed News : परळी वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात मटण, ऑम्लेट शिजवल्याचा प्रकार; भाविकांचा संताप
दिवाळीनंतर बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात ऊसतोडणीसाठी जात असतात. सर्वसाधारणपणे सहा महिन्यांची किंवा त्याहून अधिक काळाची उचल घेतली जाते. डिसेंबर तर कधी जानेवारीपर्यंत ऊसतोडणी करून कामगार घरी परतत असतात.
बीड जिल्ह्यातून दरवर्षी 1 लाख 75 हजार मजूर ऊसतोडणीच्या कामाला जातात. त्यातील 78 हजार महिला मजूर आहेत. यातील 843 महिलांनी ऊसतोडणीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचं समोर आलं असून यामध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय 1523 महिला गर्भवती असतानाही ऊसतोडणीसाठी गेल्याचीही माहिती आहे.