आकाश सावंत, बीड
Beed News: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घराच्या खोदकामादरम्यान जुन्या चांदीच्या नाण्यांचा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाने आतापर्यंत 250 नाणी जप्त केली असून, हा ठेवा मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पाटण येथील शशिकांत खुटाळे यांच्या घराच्या बांधकामाचे काम सुरू होते. खोदकामातून काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात खेळत असलेल्या मुलांना काही चांदीची नाणी आढळली. मुलांकडे नाणी दिसताच ही माहिती संपूर्ण गावात पसरली आणि खोदकामाच्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली.
(नक्की वाचा- Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)
पोलीस आणि महसूल प्रशासनाची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाने तातडीने सांगवी पाटण येथे धाव घेतली.प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून आतापर्यंत 250 चांदीची नाणी जप्त केली आहेत.
नाणी गायब असल्याचा संशय
महसूल प्रशासनाने 250 नाणी ताब्यात घेतली असली तरी, प्रत्यक्षात नाण्यांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. खोदकामात जवळपास 4 ते 5 किलो चांदीची नाणी सापडली असावीत असा संशय व्यक्त केला जात आहे.
(नक्की वाचा- Gold Rate: सोन्याचे दर प्रतितोळे 3 लाखांवर पोहोचणार? युद्धामुळे सोन्यात ऐतिहासिक तेजीचे संकेत)
पुरातत्व विभागाला पाचारण
तहसील प्रशासनाने या ऐतिहासिक ठेव्याबद्दल पुरातत्व विभागाला (Archaeology Department)* माहिती दिली आहे. या नाण्यांचा काळ कोणता आहे आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय, हे पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सापडलेल्या नाण्यांपैकी किती नाणी लोकांकडे आहेत आणि नेमका किती साठा सापडला होता, याची सखोल चौकशी पोलिसांसह महसूल प्रशासन करत आहे.