
Dadasaheb Bhagat Inspirational Story : कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी भरपूर पैसे हवे असतात असं आपण नेहमी ऐकतो. मात्र काही लोक मेहनतीच्या जोरावर आपलं स्वप्न अशक्य शक्य करून दाखवतात. राज्यातील बीड जिल्ह्यातील एका लहानशा गावातून आलेला दादासाहेब भगत याची कहाणी अत्यंत आदर्शवत उदाहरण आहे. दहावी पास दादासाहेब इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉयचं काम करता करता सीईओ बनला आहे. आता त्याची कंपनी Canva सारख्या परदेशी साइट्सना टक्कर देत आहे.
दादासाहेब दु्ष्काळी भागात राहत होता. तिथे शेती करणं कठीण होते. दुसरीकडे कुटुंबाला शिक्षणाचं महत्त्व कळत नव्हतं. त्यामुळे त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि आयटीआयचा छोटा कोर्स केला. यानंतर तो कामाच्या शोधात पुण्यात पोहोचला. येथे चार हजार रुपये महिना नोकरी करू लागला. काही काळानंतर त्याला इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉयची नोकरी मिळाली. यानंतर त्याला 9 हजार मिळू लागले. त्याच्यासाठी ही मोठी बाब होती. त्या नोकरीत त्याला साफ-सफाई करणं, सामान आणणं आणि गेस्ट हाऊसमध्ये लहान-मोठे काम करावे लागत होते.
यादरम्यान त्याने पाहिलं की, इन्फोसिसचे कर्मचारी कम्पुटरवर काम करीत चांगले उत्पन्न मिळवित आहेत. हे पाहून तो वेगळा विचार करू लागला. तो लोकांशी बोलू लागला. तुमचं काम काय असतं, ते कसं करता, त्यासाठी काय कौशल्य लागतात याबाबत लोकांशी बोलत होतो. मात्र तो दहावी पास असल्याचं सांगितल्यावर अनेकांनी हे कठीण असल्याचं सांगितलं. यावेळी काहींनी त्यांना ग्राफिक डिजाइन आणि एनिमेशनचं शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. या क्षेत्रात डिग्रीपेक्षा जास्त कौशल्य महत्त्वाचं असतं.
ही बाब दादासाहेब याला भावली. लहानपणी तो एका मंदिरातील चित्रकाराकडून पेंटिंग शिकत होता आणि तो कलाप्रेमी होता. त्याने दिवसभरात डिजाइनचं शिक्षण घेणं आणि रात्री नोकरी करण्यास सुरुवात केली. काही महिन्यात तो डिजायनर बनला आणि कम्युंटरवर काम करून पैसे कमवू लागला.
नक्की वाचा - आयुष्य कसं जगावं? खरंच..'या' मुलीकडून शिकावं..कॅन्सर पीडितेनं डॉक्टरसोबत बनवला जबरदस्त प्रेरणादायी VIDEO
मोठ्या कंपनीत नोकरी शोधण्याऐवजी त्याने स्वत:चं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्याने डिजाइन टेम्पलेट नावाची स्वत:ची कंपनी सुरू केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र तो मागे हटला नाही. कोविड-19 लॉकडाऊनच्या वेळी सर्व काही बंद झालं होतं. त्यावेळी त्याला पुन्हा पुण्याहून आपल्या घरी बीडला परतावं लागलं. गावात वीज आणि इंटरनेट नव्हतं. मात्र तो थांबला नाही. तो आपल्या साथीदारांसह जवळच्या डोंगरावर गेला. येथे एका गायशाळाजवळ कम्युटर लावुन काम सुरू केलं.
येथूनच त्याचा खरा प्रवास सुरू झाला. त्याच्या डिजाइन टेम्पलेट्सना देशभरात ओळख मिळाली. हळूहळू त्याची गोष्ट व्हायरल होऊ लागली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या कामाचं कौतुक केलं. आज दादासाहेब भगत याची कंपनी Canve सारख्या परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहे. भारतीयांना भारतीय सॉफ्टवेअरवर काम करावं आणि देशातील डिजाइन बनवावं हे त्याचं स्वप्न आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world