संजय तिवारी, प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांसमोर बोलताना महाविकास आघाडीतील आलेला कटू अनुभव सार्वजनिक केला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातून काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी उघडपणे केलेल्या बंडखोरीवर त्यांनी मनातल्या वेदना बोलून दाखवल्या आहेत. शिवसेना उबाठाला मिळालेल्या एकाच जागेवर काँग्रेस नेत्याने बंडखोरी केली, पण त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. हे शल्य त्यांनी माध्यमांसमोर उघड उघड व्यक्त केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भातील संघटनेचे दायित्व आहे. आज सकाळी विमानतळावर माध्यमांशी बोलताना ते काय म्हणाले ते पाहू या. रामटेकमध्ये काँग्रेसची बंडखोरी पाहून मी निराश झालो आहे. 2019 मध्ये 28 जागांपैकी 14 जागा आम्ही जिंकल्या होत्या, त्यापैकी किमान आठ ते दहा जागा मिळतील अशी अपेक्षा असताना महाविकास आघाडीमध्ये केवळ एक रामटेकची जागा आम्हाला मिळाली. त्या ठिकाणी बंडखोरी झाली आणि खुद्द काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी ती बंडखोरी केली. तरीही काँग्रेसने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्यासारखं वेदनादायी प्रकरण दुसरं कोणतेही नाही, असे ते म्हणाले.
नक्की वाचा - 15 दिवसात 12 बेरोजगार तरुण झाले 100 कोटींचे मालक, मालेगावात पैशांचा पाऊस
काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष अशाप्रकारे बंडखोरी करतो, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणे ही काँग्रेसची स्वतःची नैतिक जबाबदारी असून या बंडखोरी मागे काँग्रेसचे स्थानिक नेते आहे असा माझा आरोप असल्याचा जळजळीत आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. आमच्या पक्षाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, कारण मैत्री आणि आघाडीमध्ये हे वर्तन चांगलं नाही आणि असे वर्तन काँग्रेसकडून सातत्याने होत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
नवाब मलिक यांना भास्कर जाधवांचे समर्थन
नवाब मलिक माझ्या पक्षाचे नाहीत. मात्र नवाब मलिक यांच्यावर भाजपाच्या नेत्यांनी केलेले आरोप खोटे आहेत. ते पुढे म्हणाले, 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाला आणि त्यात त्यांचा हात होता हे तुम्हाला 2022 साली दिसले. त्यामुळे त्यावेळी आणि आताही मी नवाब मलिक यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world