देवा राखुंडे, प्रतिनिधी
Bhigwan Kidnapping Case: दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांनी त्यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. भिगवण येथील घटनेत पीडित कुटुंबाकडून करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपली कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी मांडली आहे. या संपूर्ण प्रकरणात आपण सुरुवातीपासूनच प्रशासनाच्या आणि संबंधित नातेवाईकांच्या संपर्कात होतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले कुल?
घटनेची माहिती मिळताच आपण तातडीने पोलीस प्रशासनाला कामाला लावले होते असे राहुल कुल यांनी सांगितले. तपासाचा आढावा घेण्यासाठी दर 1 किंवा 2 तासाला आपण पोलिसांकडून अपडेट घेत होतो आणि त्यांना वेगाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कठीण काळात संबंधित कुटुंबाला मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासन आणि आपण स्वतः प्रयत्नशील होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार राहुल कुल यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी मांडत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सामाजिक जाणिवेतून आम्ही या परिसरात काम करत आहोत.
कोणी काही आरोप करत असेल तर त्यांना मला हेच सांगायचे आहे की मलाही एक मुलगी आहे. माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिल्या आहेत, त्यामुळे महिलांचे प्रश्न कसे हाताळावेत याची पूर्ण जाणीव मला आहे. केवळ राजकीय हेतूने किंवा गैरसमजातून असे आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा : Bhigwan Kidnapping Case: तरुणीला आईकडे जायचं नाही, मग कुठे राहणार? पोलीस स्टेशनमध्ये काय झालं? वाचा सर्व अपडेट )
स्टेटस प्रकरणावर उत्तर
या प्रकरणात सोशल मीडियावरील स्टेटसचा जो विषय समोर आला आहे, त्यावर राहुल कुल यांनी त्यांची बाजू मांडली. आपण या विषयात पीडित बाजूने अतिशय खंबीर भूमिका घेतल्यामुळे कदाचित कोणाचे तरी हितसंबंध दुखावले गेले असावेत आणि त्यातूनच हे घडले असावे, असे प्राथमिक मत त्यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक लोकांशी स्नेहपूर्वक संबंध असतात, मात्र कोणी कोणाचे स्टेटस ठेवले म्हणून थेट आरोप करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर शेख याला आपण ओळखत नसल्याचे राहुल कुल यांनी स्पष्ट केले आहे. गुन्हा भिगवणमध्ये घडला असून संबंधित व्यक्ती बारामतीमध्ये हजर झाली आहे, या संपूर्ण घटनाक्रमाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जे कोणी या प्रकरणात दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
( नक्की वाचा : Pune News : खळबळजनक! इंदापूर तालुक्यात 25 मुली जिहाद्यांच्या ताब्यात? पडळकरांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला )
कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन
आरोप करणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती तपासावी आणि मगच बोलावे असे आवाहन राहुल कुल यांनी केले आहे. आपण अद्यापही मामांच्या आणि इतर नातेवाईकांच्या संपर्कात असून त्या कुटुंबाला जी काही मदत लागेल, ती देण्यासाठी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत. जर कुटुंबाला आपल्याला भेटण्याची इच्छा असेल, तर आपण नक्कीच त्यांना भेटून सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world