Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा शेवट भाजपला बसलेल्या धक्क्याने झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी बंडखोरी करत काँग्रेसप्रणीत 'सेक्युलर फ्रंट'च्या पाठिंब्यावर महापौरपदी विजय मिळवला आहे.
नारायण चौधरी यांना मिळाली 48 मतं
महापौर पदासाठी नारायण चौधरी यांना एकूण 48 मतं मिळाली. या निकालानुसार मुस्लीम बहुल परिसरामध्ये नारायण चौधरी हे महापौर असणार आहेत. तर कोणार्क आघाडीचे उमेदवार विलास रघुनाथ पाटील यांना 25 मतं तर भाजप उमेदवार स्नेहा पाटील यांना एकूण 16 मतं मिळाली.
भाजपला स्वतःची खेळी पडली भारी
भाजपने 18 फेब्रुवारी रोजी नारायण चौधरी यांना डावलून ऐनवेळी स्नेहा पाटील (Sneha Patil) यांना महापौरपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी आपल्या 7 ते 8 समर्थक नगरसेवकांसह स्वतंत्र गट स्थापन केला आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
भिवंडी महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल
- काँग्रेस : 30
- भाजपा : 22
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): 12
- शिवसेना (शिंदे गट):12
- समाजवादी पक्ष :06
- कोणार्क विकास आघाडी : 05
- भिवंडी विकास आघाडी : 03
- अपक्ष : 1
अल्पसंख्याक चेहऱ्याऐवजी हिंदू महापौर
भिवंडी महापालिकेत सहसा अल्पसंख्याक समाजाचा महापौर होण्याची परंपरा राहिली आहे, पण यंदा काँग्रेसने (Congress) राजकीय रणनीती बदलत भाजपच्याच बंडखोर नेत्याला महापौर पदाची संधी देऊन भाजपला मोठा धक्का दिला.
सेक्युलर फ्रंटचे वर्चस्वकाँग्रेस, राष्ट्रवादी (राशप) आणि भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी एकत्र येत 'सेक्युलर फ्रंट' स्थापन करून सत्ता स्थापन केली आहे.
भाजपमध्ये बंडखोरी; आशिष शेलार आक्रमकभिवंडीत भाजपमध्ये झालेल्या या बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "जे लोक भाजप सोडून गेले आहेत, ते पक्षासाठी महत्त्वहीन आहेत. त्यांना बंडखोर म्हणता येणार नाही, कारण जो पक्षाच्या विचारधारेपासून वेगळा होतो, तो भाजपचा उरत नाही. तो आमच्यासाठी अवांछित आहे". तसंच या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन प्रदेशाध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world