जाहिरात

Jalgaon News: जळगावात ठाकरे गटाला खिंडार! बडा नेता हाती घेणार 'धनुष्यबाण'; 6 मार्चला जाहीर प्रवेश

Jalgaon News: माजी खासदार उन्मेष पाटील 6 मार्च रोजी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी त्यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Jalgaon News: जळगावात ठाकरे गटाला खिंडार! बडा नेता हाती घेणार 'धनुष्यबाण'; 6 मार्चला जाहीर प्रवेश

मंगेश जोशी, जळगाव

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नाव असलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्मेष पाटील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून, यामुळे ठाकरे गटाला जळगावात मोठा धक्का बसला आहे.

येत्या 6 मार्च रोजी मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात अधिकृतपणे प्रवेश करतील. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद जळगावात वाढणार असली, तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि उन्मेष पाटील यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

प्रवेशापूर्वी गुलाबराव पाटलांची भेट

प्रवेशाचा निर्णय निश्चित झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी जिल्ह्यातील शिंदे गटाचे प्रभावशाली नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, 6 मार्चच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे.

उन्मेष पाटील यांचा राजकीय प्रवास आणि संघर्ष

उन्मेष पाटील यांचा गेल्या दोन वर्षांतील राजकीय प्रवास अत्यंत चढ-उताराचा राहिला आहे:

  • 2024 लोकसभा: भाजपचे विद्यमान खासदार असतानाही पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. यामुळे नाराज होऊन त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
  • 2024 विधानसभा: ठाकरे गटाकडून त्यांनी चाळीसगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
  • भाजपशी संघर्ष: ठाकरे गटात असताना त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली होती.

भाजपच्या विरोधाची टांगती तलवार

उन्मेष पाटील आता महायुतीत (शिंदे गट) प्रवेश करत असले, तरी भाजपचा स्थानिक गट त्यांना सहजासहजी स्वीकारणार का? हा मोठा प्रश्न आहे. गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्यावरील आरोपांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे. अशा परिस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीला जळगावातील हे अंतर्गत वाद मिटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com