राहुल कांबळे, प्रतिनिधी
2024 विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व निर्देशानुसार पोलीस महासंचालकांनी मुंबई शहर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर व वसई-विरार या चार पोलीस आयुक्तालयातून बदलीस पात्र असलेल्या 263 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या.
त्याचप्रमाणे मुंबई शहरातील 22 पोलीस निरीक्षकांची नवी मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांनी त्यांची बदली करण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर होऊन कार्यभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने राज्यात विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाबाह्य बदल्या केल्या. आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबईतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनी पोलीस दलावर मानसिक दबाव वाढला आहे.
नक्की वाचा - नवी मुंबईत काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश; निराश न होता काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
पोलिसांमध्ये नाराजी..
निवडणूक आयोगाच्या या निर्णयांमुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे. निवडणुकांमुळे प्रशासनावर वाढणारा ताण लक्षात घेता, असे निर्णय घेताना आयोगाने अधिक सजगता दाखवली पाहिजे, असंही म्हटलं जात आहे. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल, अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world