जाहिरात

Akola News : अकोल्यात BJP-AIMIM छुप्या युतीचा 'खेळ' उघड; फोटो पुराव्यांनी भाजपा नेत्यांची पोलखोल

Akola News : अकोला जिल्ह्यातल्या  अकोट नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. या नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम यांच्यातील छुप्या युतीचा पर्दाफाश झालाय.

Akola News : अकोल्यात BJP-AIMIM छुप्या युतीचा 'खेळ' उघड; फोटो पुराव्यांनी भाजपा नेत्यांची पोलखोल
Akola News : फोटोंच्या पुराव्यांनी भाजप नेत्यांची चांगलीच कोंडी झाली असून अकोटमध्ये सध्या हाच चर्चेचा विषय ठरत आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola News : अकोला जिल्ह्यातल्या  अकोट नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. या नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम यांच्यातील छुप्या युतीचा पर्दाफाश झालाय. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांच्या टीकेनंतर ही युती तुटल्याचे भासवले जात होते. मात्र नुकत्याच झालेल्या स्वीकृत सदस्य निवडीने या दाव्यांमधील फोलपणा उघड केला आहे. समोर आलेल्या फोटोंच्या पुराव्यांनी भाजप नेत्यांची चांगलीच कोंडी झाली असून अकोटमध्ये सध्या हाच चर्चेचा विषय ठरत आहे.

राजकीय साटलोटं आणि फोटोंचा पुरावा

स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेले जितेंन बरेठिया आणि त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचा दावा आमदार प्रकाश भारसाकळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटोंनी या दाव्यांची हवा काढून टाकली आहे. 

या फोटोंमध्ये बरेठिया पिता-पुत्र भाजपचा गमछा घालून, फडणवीसांकडून पक्षप्रवेशाची दीक्षा घेताना आणि खासदार संजय धोत्रे यांच्यासोबत वावरताना स्पष्ट दिसत आहेत. यामुळे भाजप नेत्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा थेट आरोप आता होत आहे.

Latest and Breaking News on NDTV

आमदार भारसाकळेंच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण राजकीय घडामोडींमागे आमदार प्रकाश भारसाकळे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पत्नीच्या पराभवानंतर भारसाकळे यांनी अकोटमध्ये आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी एका विशिष्ट चौकडीच्या माध्यमातून नगरसेवकांची जुळवाजुळव केली आणि त्यात एमआयएमलाही सोबत घेतले. 

वरकरणी युती तुटल्याचे सांगितले जात असले, तरी रामचंद्र बरेठिया यांना दिलेल्या शब्दानुसार त्यांच्या मुलाला स्वीकृत सदस्य करण्यासाठी एमआयएमच्या माध्यमातूनच सर्व सूत्रे फिरवण्यात आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

( नक्की वाचा : ZP Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर )

नेत्यांची कोंडी आणि जनतेचा संताप

व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये केवळ सार्वजनिक कार्यक्रमांचे फोटो नाहीत, तर थेट आमदार भारसाकळे यांच्या घरातील कौटुंबिक वावर असलेले फोटोही समोर आले आहेत. यामुळे बरेठिया कुटुंबीय भाजपचे नाहीत, हे सांगणे नेत्यांना कठीण झाले आहे. यापूर्वीही माध्यमांच्या बातम्यांना खोटे ठरवणाऱ्या भारसाकळे यांना त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घरचा आहेर दिला होता. 

आता नव्या पुराव्यांमुळे नेत्यांनी खोटे बोलून जनतेची फसवणूक केली का,असा सवाल अकोटकर विचारत आहेत. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून संबंधित नेत्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com